google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

गुटखा माफियांचे ‘रक्षक’ मुख्यालयात

90 लाखांच्या वसुलीच्या आरोपानंतर मोठी कारवाई; पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती 

                                    स्वराज न्यूज नेटवर्क 

अहिल्यानगर : जिल्ह्यात गुटखा माफियांकडून दरमहा सुमारे 90 लाख रूपयांची वसूली दोन पोलीस अंमलदार करत असल्याचा गंभीर आरोप संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात केला होता. या आरोपांनंतर आता स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार हृदय घोडके आणि अप्पर पोलीस अधीक्षक (श्रीरामपूर) कार्यालयातील अंमलदार शंकर चौधरी यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबत माहिती दिली.

               जिल्ह्यात गुटख्याचा बेकायदेशीर धंदा मोठ्या प्रमाणात सुरू असून परराज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा आणून त्याची खुलेआम विक्री केली जात असल्याचा मुद्दा आ. खताळ यांनी अधिवेशनात उपस्थित केला होता. या बेकायदेशीर साखळीला जिल्हा पोलीस दलातील दोन अंमलदारांचे पाठबळ असून त्यांच्याकडून गुटखा माफियांकडून दरमहा तब्बल 90 लाख रूपयांची वसूली केली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला होता. विधानभवनात बोलताना आ. खताळ यांनी अंमलदार घोडके व चौधरी यांची नावे घेतली होती आणि या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात उत्तर देताना संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते.
             दरम्यान, हा मुद्दा मागील अधिवेशनात उपस्थित होऊनही तब्बल अडीच महिने कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. मात्र, सध्या मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर गुरूवारी (5 मार्च) या दोन्ही अंमलदारांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली. गुटखा माफियांसोबत संबंध ठेवून वसूली केल्याच्या आरोपांमुळे त्यांची बदली करण्यात आल्याने जिल्हा पोलीस दलात याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
            दरम्यान, श्रीरामपूर येथील नीलेश शेंडगे खून प्रकरणातील संशयित आरोपींशी अंमलदार शंकर चौधरी यांचे संबंध असल्याचा आरोपही काही दिवसांपूर्वी झाला होता. याबाबत राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार देखील करण्यात आली होती. तसेच अंमलदार हृदय घोडके यांची काही महिन्यांपूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वीही स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार शामसुंदर गुजर याला जप्त केलेले ड्रग्ज विक्री केल्याच्या आरोपावरून बडतर्फ करण्यात आले होते. आता घोडके यांच्यावर गुटखा माफियांशी संबंध असल्याचा आरोप झाल्याने स्थानिक गुन्हे शाखा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
गैरकृत्य करणाऱ्यांची गय नाही
पोलिसांनी जप्त केलेले ड्रग्ज विक्री केल्याप्रकरणी अंमलदार शामसुंदर गुजर याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आता गुटखा माफियांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अंमलदार घोडके यांची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. खात्यात गैरकृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. – पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे 
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!