google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

शेतवादातून शेतकऱ्याचा खून; एक जखमी

नेवासा तालुक्यातील देडगाव येथील घटना; महिला आरोपीस अटक

                                     स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : शेतरस्त्याच्या वादातून नेवासा तालुक्यातील देडगाव येथील शेतकऱ्याला झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला असून त्याच्या जखमी मुलावर नेवासा फाटा येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. 
                नेवासा पोलिसांना गोरक्षनाथ बनसोडे वय 33 वर्षे धंदा शेती रा. देडगाव ता. नेवासा जि. अहिल्यानगर यांनी फिर्याद दाखल केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की मी माझे वडिल आदिनाथ बनसोडे, आई मिराबाई बनसोडे, पत्नी काजल बनसोडे, अपत्य कृष्णा बनसोडे यांचेसह बनसोडे वस्ती, देडगाव ता. नेवासा येथे रहाण्यास असुन शेती व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.
         माझे घराशेजारी माझा चुलत भाऊ चंद्रकांत बनसोडे हा त्याचे पत्नी सविता बनसोडे, मुलगा बबलु उर्फ रोहित बनसोडे यांचेसह रहाण्यास आहे. मागील अंदाजे पाच वर्षापासुन माझे वडिलांचे नावे असलेल्या देडगाव येथील शेत गट क्रं. 425/1 वरुन आमच्यात वाद आहेत. तहसीलदार यांचे आदेशाने सदर शेतीचा रस्त्याबाबतचा निकाल आमचे बाजुने लागलेला आहे. परंतु चंद्रकांत बनसोडे यांनी शेतजमीन त्यांना वाटणीमध्ये कमी मिळाली म्हणून नेहमी माझेशी व माझे कुटुंबासोबत वाद व शिवीगाळ करत असे. प्रत्येक वेळी मी व माझे वडिलांनी चंद्रकांत व त्याचे मुलास शेतजमीन मोजणी करण्याबाबत समजावून सांगत असे. परंतु वेळोवेळी चंद्रकांत त्याचे कुटुंबासह आम्हांस त्रास देत असे.
               दि. 9 जून रोजी सकाळी 11:30 वा. चे सुमारास मी माझ्या कुटुंबासह घरी असताना तेथे चुलत भाऊ चंद्रकात आला असता मी त्यास आमचे शेतामध्ये तू मकाची पेरणी का केलीस असे मी व माझे वडिल घरासमोरील अंगणात विचारपुस करत असताना चंद्रकांत याचा मुलगा रोहित हातात लोखंडी पहार घेवुन पळत आला व त्याने काहीएक विचार न करता वडिल आदिनाथ बनसोडे यांचे डोक्यात पहारीने वार करून गंभीर जखमी करून जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चंद्रकांत याने मला धरुन हातातील विटेने माझे डाव्या डोळ्यावरील भुवईवर मारुन दुखापत केली. सविता बनसोडे सदर ठिकाणी आली असता तिने मला लाथाबुक्क्याने मारहाण करून यांना आज जीवे ठार मारा, सोडु नका असे म्हणत शिवीगाळ केली.
              आमचे भांडण बघुन आमचे घराशेजारी राहणारे भाऊसाहेब बनसोडे, माझी पत्नी काजल बनसोडे, आई मिराबाई बनसोडे यांनी मला व माझे वडिलांना भांडणातुन सोडवले, आरडाओरडा ऐकुन चंद्रकांत व त्याचा मुलगा रोहित, त्याची पत्नी सविता बनसोडे हे तेथून पळुन गेले. माझे वडिलांचे डोक्यातून रक्त येत असल्याने व ते बेशुध्द झाल्याने मी जखमी अवस्थेत आमचे गावातील ॲम्बुलन्सला कॉल करुन बोलावले व मी, माझे वडिल आदिनाथ बनसोडे नातेवाईकासह ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे आलो. तेथील डॉक्टरांनी माझे वडिलांवर उपचार करुन अहिल्यानगर येथे रेफर केले. मी जखमी असल्याने नेवासा फाटा येथील डॉ. पाटिल शिवसंगीता हॉस्पीटल येथे उपचाराकरीता दाखल झालो. माझे वडिलांना पुढील उपचारा करिता मॅककेअर हॉस्पीटल, अहिल्यानगर येथे दाखल केले. दिलेल्या फिर्यादीनुसार नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
               दरम्यान यातील जखमी आजिनाथ बनसोडे यांचे आज पहाटे (दि. 10 जून) निधन झाल्याने या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवण्यात आले आहे. गुन्ह्यात सहभागी असलेली महिला आरोपी सविता बनसोडे हिस अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज अहिरे हे करीत आहेत.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!