google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

सौंदाळा-नागापूर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

ग्रामस्थांची तक्रार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम; नेवासा तालुक्यातील घटना

                                     स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : तालुक्यातील सौंदाळा ते नागापूर दरम्यान मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे तीन किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्याचे काम सुरू असून, हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची गंभीर तक्रार ग्रामस्थ रामकिसन आरगडे यांनी अहिल्यानगर विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे लेखी स्वरूपात दाखल केली आहे. या कामात अनेक ठिकाणी नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून, गावकऱ्यांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
             यावेळी तक्रारीत आरगडे यांनी नमूद केले आहे की, रस्त्याच्या साईड गटारासाठी पाच ते सहा फूट खोल चर खणण्यात आले असून, त्यामधून शेतकऱ्यांच्या शेतातील मुरुम व माती काढून तीच माती भराव म्हणून रस्त्यावर टाकण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाइपलाईनचे नुकसान झाले असून, भविष्यात पाण्याचा पुरवठा व शेतीचे काम देखील अडथळ्यांमध्ये सापडू शकते. गटारांची खोली व रचना ही नियमानुसार दोन ते अडीच फूट असावी लागते, जेणेकरून पावसाचे पाणी योग्य रस्त्याने वाहून जाऊ शकेल. मात्र, येथे चुकीच्या पद्धतीने गटार खोदल्यामुळे पाण्याचा निचरा होण्याची शक्यता कमी आहे.
              रस्त्याच्या बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या जीएसबी थरात देखील गंभीर त्रुटी आहेत. जीएसबी टाकताना लेव्हल आणि जाडीची मोजणी न करता थर टाकण्यात आले आहेत, त्यावर ना पाणी घालण्यात आले, ना रोलिंग करण्यात आले. परिणामी हा थर खचत असून, त्यावर होणारे डांबरीकरण फार काळ टिकू शकणार नाही. याशिवाय, जी1, जी2 आणि एमपीएम थर देखील अपूर्ण व निकृष्ट पद्धतीने टाकण्यात आले आहेत. काही ठिकाणी सिंगल तर काही ठिकाणी डबल थर टाकण्यात आले असून, आवश्यक जाडीच्या तुलनेत केवळ ४० ते ६० मिमी जाडीच आढळून आली आहे. काही ठिकाणी खडी उघडी पडून १५-२० दिवसांपासून तशीच आहे, त्यामुळे ती माती व मुरुमात मिसळून निकृष्ट बनली आहे.
            या कामासाठी आवश्यक असलेला रॉयल्टीचा खर्चही ठेकेदाराने टाळल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शासनाच्या आर्थिक नियमांचेही उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आरगडे यांनी मागणी केली आहे की, सदर रस्त्याचे काम तात्काळ थांबवून गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत चौकशी करावी, दोषी ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी आणि शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी त्वरित उपाययोजना कराव्यात. अन्यथा ग्रामस्थांना उपोषण व धरणे आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा त्यांनी आपल्या पत्रात दिला आहे.
          निवेदन देताना रामकिसन आरगडे यांच्यासोबत सुधीर आरगडे, चंद्रकांत आरगडे, गणेश बारे, राजेंद्र तारडे, सुधाकर आरगडे, संभाजी बारे, शिवाजी आरगडे, मिनीनाथ आरगडे, अमित आरगडे, दत्तात्रय आरगडे, राजू आरगडे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!