
स्वराज न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्रात पुन्हा पेपरफुटीचं सत्र सुरू झालं आहे. विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट आहे. NEET नंतर आता TET परीक्षेचा पेपर फुटला आहे. ठाण्यात होणारा पेपर फुटल्याने खळबळ उडाली आहे. पेपर फुटल्यामुळे तातडीनं उद्या होणारी TET परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परीक्षा पुन्हा कधी होणार याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

हा पेपर कसा फुटला? याची पाळमूळ किती खोल आहेत या सगळ्याचा तपास केला जाणार आहे. नीट परीक्षेचा पेपर याआधी फुटला होता. यामध्ये एकूण 13 जणांना अटक करण्यात आली होती. महाराष्ट्रातून 9 आरोपी अटक केले होते. या सगळ्याला महिनाही उलटत नाही तोपर्यंत टीईटी परीक्षेचा पेपर फुटला आहे.
महाराष्ट्रातलं पेपरफुटीचं ग्रहण काही केल्या संपत नाही. परीक्षा होण्याच्या 24 तास आधीच पेपर बाहेर आल्याने खळबळ उडाली आहे. या परीक्षेचे पेपर पैसे देऊन वाटले जात असल्याची टीप पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी सापळा रचून पेपर वाटणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांना हे पेपर कुठून मिळाले? सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडून सध्या पेपर वाटणाऱ्या आरोपींची चौकशी सुरू आहे. शिक्षण विभागाला या सगळ्याची माहिती देण्यात आली आहे. शिक्षण विभागही आपली भूमिका थोड्याच वेळात जाहीर केला जाणार आहे.
6 लाख 128 विद्यार्थी ही परीक्षा देणार होते. त्यांना नोटीफिकेशनद्वारे परीक्षा पुन्हा कधी होणार आणि वेळ काय असेल याबाबतची माहिती दिली जाणार आहे. परीक्षा परिषदेच्या उपायुक्तांनी पेपर तांत्रिक कारणामुळे तूर्तास होऊ शकणार नाही तो पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं आहे. परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे याांनी उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलल्याची कन्फर्म माहिती एका वृत्तवाहिनीला बोलताना दिली आहे.
परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे काय म्हणाल्या?
6 लाख 128 विद्यार्थी ही परीक्षा देणार होते. काही तांत्रिक कारणामुळे ही परीक्षा तूर्तास रद्द कऱण्यात आली आहे. याबाबत तारीख आणि वेळ आम्ही विद्यार्थ्यांना नोटिफिकेशनद्वारे पाठवू असं सांगितलं आहे. एक हजार सातशे अठ्ठावीस केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. त्याची तयारी करण्यासाठी आम्ही आता इथे सगळे जमलो आहोत. सध्या तांत्रिक कारणामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.



