ब्रेकिंग
धीरज परदेशी मृत्यूच्या निषेधार्थ नेवासा कडकडीत बंद
सकल हिंदू समाजाचा पायी मोर्चा; मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याची मागणी

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : अहिल्यानगर महापालिकेचे खाजगी कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना व सकल हिंदू समाजाच्या वतीने मंगळवारी (दि. ११) नेवासा बंदची हाक देण्यात आली. व्यापारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहरात कडकडीत बंद पाळला. नेवासा फाटा व शहरातील प्रमुख बाजारपेठा व रस्ते दिवसभर जवळपास बंद होते.
नेवासा बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळी अकरा वाजता मळगंगा देवी मंदिरापासून पायी मोर्चाला सुरुवात झाली. बसस्थानक, गणपती चौक, नेवासा-श्रीरामपूर रोडमार्गे तहसील परिसरापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात सकल हिंदू समाजाच्या वतीने घटनेबाबत तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या.

दरम्यान, सकल हिंदू समाज, नेवासा तालुक्याच्या वतीने प्रशासनास निवेदन देऊन घटनेचा निषेध करण्यात आला. सर्व आरोपींना तातडीने अटक करावी, घटनेचा जलदगतीने निष्पक्ष व पारदर्शक तपास करावा, या प्रकरणामागील मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यावा तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
यावेळी नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष डॉ करणसिंह घुले, अँड मयूर वाखुरे, भाऊसाहेब वाघ, ज्ञानेश्वर पेचे, सुनील परदेशी, पप्पू परदेशी, निरंजन डहाळे, नितीन जगताप तसेच सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख चौक तसेच संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.



