google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

लाखो भाविकांनी घेतले माऊलींच्या “पैस” खांबाचे दर्शन

कामिका एकादशी निमित्ताने नेवासा येथे उसळला भक्ती सागर; शेकडो पायी दिंड्या दाखल

                                      स्वराज न्यूज नेटवर्क 

नेवासा : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरी व अमृतानुभव या ग्रंथाचे रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथे कामिका वद्य एकादशीच्या यात्रेनिमित्त माऊलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या “पैस” खांबाचे दिवसभरात सुमारे आठ लाख भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी “पुंडलीक वरदे…हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,”ज्ञानोबा माऊली तुकाराम” च्या जयघोषाने नेवासे नगरी दुमदुमली होती.
           एकादशीच्या निमित्ताने रविवारी दि.९ ऑगस्ट रोजी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास वेदमंत्राच्या जयघोष करत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख वेदांताचार्य हभप गुरुवर्य श्री देविदासजी महाराज म्हस्के यांच्या हस्ते माऊलींचे मूर्तीमंत रूप असलेल्या “पैस” खांबाचे वेदमंत्राच्या जयघोषात पूजन करण्यात आले. यावेळी मध्यमेश्वर देवस्थानचे बालयोगी महंत श्री ऋषिनाथजी महाराज, नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले, देवस्थानचे विश्वस्त ज्ञानेश्वर माऊली शिंदे, मुख्य चोपदार गणेश महाराज आरगडे, हरी महाराज भोगे, राम महाराज खरवंडीकर, भगवान महाराज डिके, मयूर महाराज डौले, डॉ.संजय सुकाळकर, नगरसेवक जालिंदर गवळी, विश्वस्त कृष्णाभाऊ पिसोटे, गुंफाबाई पिसोटे, माऊली भक्त कृष्णाभाऊ खरड व शांताबाई खरड उपस्थित होते.
       आषाढी शुद्ध नंतर येणारी आषाढी वद्य कामिका  एकादशी ही माऊलींची एकादशी म्हणून संबोधली जाते.पंढरपूरला गेलेल्या वारकऱ्यांच्या वारीची पूर्णता माऊलींच्या या एकादशीला होते म्हणून या एकादशीला फार महत्व असते. यात्रेच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणाच्या बाहेर दर्शनबारी रांगेसह मुख दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती.
       दर्शन बारीसाठी  एक किलोमीटर अंतरावर रांगा लागल्या होत्या. तर मंदिर प्रांगणात माजी मंत्री शंकरराव गडाख मित्र मंडळासह पंचगंगा उद्योग समूहाच्या वतीने उद्योजक प्रभाकरराव शिंदे, संचालक बाळासाहेब शिंदे, काकासाहेब शिंदे यांच्या वतीने आलेल्या भाविकांसाठी मोफत शाबुदाना खिचडीचे प्रसादाचे वाटप करण्यात आले.
                  यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, उद्योजक रविराज तलवार, लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्था, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, सुवर्णकार समाज माऊली मित्र मंडळ, मगर परिवार, नागेबाबा पतसंस्था, नेवासा तालुका ब्राम्हण सभा यांच्यावतीने शाबुदाना खिचडी, शेंगदाणे, चहा, दूध आदी खाद्य पदार्थांचे वाटप करण्यात आले. एकादशीच्या निमित्ताने देवगड दत्त मंदिर संस्थानचे प्रमुख महंत गुरुवर्य महंत श्री भास्करगिरीजी महाराज उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज,नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, माजी आमदार संभाजीराव फाटके, बाळासाहेब मुरकुटे, विश्वासराव गडाख यांनी मंदिरास भेट देऊन माऊलींच्या पैस खांबाचे दर्शन घेतले.
       माऊली भक्तांच्या सेवेसाठी प्रशासनाच्या वतीने तहसीलदार डॉ.संजय बिरादार तर पोलीस दलाच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकाचौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंदोबस्तासाठी नेवासा होमगार्ड जवानांसह महिला होमगार्डने देखील निष्काम सेवा दिली. संत ज्ञानेश्वर महाराज भक्त मंडळाच्या स्वयंसेवकांनी वारकऱ्यांना व्यवस्थित दर्शन घेता यावे म्हणून मोलाची सेवा दिली.
           नेवासा शहरातील जिल्हा परिषद शाळा प्रांगण, ज्ञानोदय हायस्कूल प्रांगण,नेवासा बुद्रुक येथील नाथबाबा विद्यालय, नेवासा मार्केट कमिटी प्रांगण या मुख्य ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. कामिका वद्य एकादशीच्या निमित्ताने पहाटे दोन पासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. संत ज्ञानेश्वर महाराज “पैस” खांब मंदिर व वैकुंठवाशी हभप बन्सी महाराज तांबे यांच्या समाधी मंदिरावर केलेली विद्युत रोषणाई भाविकांचे आकर्षण ठरली होती. आषाढी वद्य एकादशी ही माऊलींची एकादशी असल्याने नेवासा शहरासह संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे जाणारे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. 
        माऊलींच्या यात्रेनिमित्त नेवासा तालुक्यासह राहुरी, श्रीरामपूर,शेवगाव या भागातून आलेल्या शेकडो दिंड्यांनी  “ज्ञानोबा माऊली तुकाराम” चा गजर करत हजेरी लावली.यावेळी आलेल्या सर्व दिंडयांतील वारकऱ्यांचे मंदिर देवस्थानचे प्रमुख विश्वस्त वेदांताचार्य हभप देविदासजी महाराज म्हस्के शास्त्री, देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्यासह विश्वस्त मंडळाने श्रीफळ प्रसाद देऊन स्वागत केले. यात्रेनिमित्त नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटेपासूनच चौकाचौकात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!