नेवासा शहरात कुत्रा चावण्याच्या घटनांत वाढ
पाच महिन्यांत २०४ जणांना एआरव्ही लस; भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला; नागरिकांत भीतीचे वातावरण प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा खुर्द परिसरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या जानेवारी ते मे २०२६ या अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत २०४ नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्यामुळे रेबीज प्रतिबंधक (ARV) लसीचा पहिला डोस देण्यात आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र, नेवासा खुर्द यांच्या अधिकृत नोंदीतून समोर आली आहे. या आकडेवारीमुळे परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
नेवासा खुर्द येथील आरोग्य केंद्राच्या आकडेवारीनुसार जानेवारीमध्ये ४१, फेब्रुवारीमध्ये ४२, मार्चमध्ये ४३, एप्रिलमध्ये ३६ आणि मे महिन्यात ४२ नागरिकांनी कुत्र्याच्या चाव्यानंतर उपचारासाठी आरोग्य केंद्रात धाव घेतली. एकूण २०४ जणांना एआरव्ही लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. जवळपास प्रत्येक महिन्यात चाळीसहून अधिक रुग्ण आढळल्याने हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
नेवासा खुर्दसह परिसरातील अनेक वाड्या-वस्त्यांमध्ये, बाजारपेठ, बसस्थानके तसेच सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचे टोळके मुक्तपणे फिरताना दिसतात. सकाळी शाळेत जाणारी मुले, दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक आणि पायी चालणाऱ्या नागरिकांवर कुत्रे धावून जाण्याच्या घटनाही वारंवार घडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी निर्बिजीकरण मोहीम, लसीकरण आणि आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. नेवासा नगरपंचायत तसेच पशुसंवर्धन विभागाने समन्वयाने तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कुत्रा किंवा इतर प्राण्याने चावा घेतल्यास जखम तात्काळ साबण आणि स्वच्छ पाण्याने किमान १५ मिनिटे धुवावी, कोणतेही घरगुती उपाय न करता त्वरित जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन रेबीज प्रतिबंधक उपचार सुरू करावेत. उपचारात विलंब करणे धोकादायक ठरू शकते.
पाच महिन्यांतील आकडेवारी
जानेवारी – ४१
फेब्रुवारी – ४२
मार्च – ४३
एप्रिल – ३६
मे – ४२
एकूण – २०४
सदर आकडेवारी प्राथमिक आरोग्य केंद्र, नेवासा खुर्द येथे एआरव्ही (Anti Rabies Vaccine) पहिला डोस घेतलेल्या रुग्णांची असून, इतर आरोग्य केंद्रे किंवा खासगी रुग्णालयांतील रुग्ण यामध्ये समाविष्ट नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष घटनांची संख्या यापेक्षाही अधिक असू शकते.



