ब्रेकिंग
पोनि प्रताप दराडे यांचा पहिल्याच दिवशी धडाका
हंडीनिमगाव शिवारातील श्री हॉटेलवर छापा; अनैतिक व्यवसाय प्रकरणी तिघे जेरबंद; नेवासा पोलिसांची कारवाई

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी धडाकेबाज कारवाई करत हंडीनिमगाव शिवारातील श्री हॉटेल लॉजिंगवर छापा टाकून अनैतिक व्यवसाय प्रकरणी तिघांना जेरबंद केले.
शुक्रवार (दि. १२) रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हंडीनिमगाव शिवारातील श्री हॉटेल येथे महिलांकरवी अनैतिक व्यवसाय करून घेतला जात असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पंचांसह घटनास्थळी पाठवून नियोजनबद्ध छापा टाकण्याच्या सूचना दिल्या.
या कारवाई दरम्यान मल्हारी शंकर नगरे (वय ३४, रा. खुपटी रोड, नेवासा), सतीश दिलीप मेटे (वय ३०, रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर) आणि लखन राजेंद्र भणगे (वय २५, रा. हंडीनिमगाव, ता. नेवासा) हे काही पीडित महिलांकरवी अनैतिक व्यवसाय करून घेत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर तिघांविरुद्ध पंचनामा करून त्यांना नेवासा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
महिला पोलीस अंमलदार भारती पवार यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४३(३) तसेच स्त्रिया व मुलींच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा, १९५६ अंतर्गत कलम ३, ४, ५, ७ व ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय साठे, पोलीस कॉन्स्टेबल श्रीनाथ गवळी, सुमित करंजकर, नारायण डमाळे तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल भारती पवार व गीता पवार यांनी सहभाग घेतला.
नवनियुक्त पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या या कारवाईची नेवासा तालुक्यात सर्वत्र चर्चा होत असून अनैतिक व्यवसायांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचा संदेश या कारवाईतून गेला आहे.



