google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

‘अवकाळी’मुळे बाधित शेतकऱ्यांसाठी २१ कोटी ३० लाख

नगर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या मदतीस मंजुरी; नेवासा तालुक्याला सर्वाधिक मदत 

                                    स्वराज न्यूज नेटवर्क

अहिल्यानगर : एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे बाधित झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी २१ कोटी ३० लाख ३७ हजार ४०० रुपयांच्या अनुदानास शासनाने मंजुरी दिली असून, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.
                जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सादर केलेल्या अंतिम सुधारित अहवालानुसार जिल्ह्यातील १९९ गावांतील २१ हजार ४९५ शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झाले असून, १२ हजार ३४६.३९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. तालुकानिहाय आकडेवारीनुसार नेवासा तालुक्यात सर्वाधिक १० हजार २९४ शेतकरी व ६ हजार ३३५.७२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्याखालोखाल राहुरी, पारनेर, राहाता व कोपरगाव तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
               ही मदत शासनाच्या २७ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांसाठी मंजूर करण्यात आली आहे. त्यानुसार जिरायत क्षेत्रासाठी प्रतिहेक्टर ८ हजार ५०० रुपये, बागायत क्षेत्रासाठी प्रतिहेक्टर १७ हजार रुपये व फळबाग क्षेत्रासाठी प्रतिहेक्टर २२ हजार ५०० रुपये या दराने अनुदान देण्यात येणार आहे.
             चालू हंगामात यापूर्वी वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या मंजूर निधीचा समावेश नसल्याची खात्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच एका हंगामात विहित दराने केवळ एकदाच मदत देण्यात येईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत.
             लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येणार असून, कोणत्याही लाभार्थ्यास दुबार मदत मिळणार नाही याची तहसील कार्यालयांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
               मंजूर निधीचा वापर केवळ मंजूर उद्देशासाठीच करण्यात यावा. निधी खर्च करताना शासन निर्णयातील सर्व सूचना, निकष, अटी व शर्तींचे काटेकोर पालन करावे. नैसर्गिक आपत्तीबाबत विहित अटींची पूर्तता झाल्यानंतरच मदतीचे वितरण करण्यात यावे, अशा सूचनाही आदेशात देण्यात आल्या आहेत.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!