ब्रेकिंग
सरकारने बच्चू कडू यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात..
अन्यथा, तीव्र आंदोलन..! श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे वतीने अन्नत्याग आंदोलनाला जाहीर पाठिंबा; राहुरी तहसीलदारांना निवेदन..!

स्वराज न्यूज नेटवर्क
राहुरी : सरकारने बच्चू कडू यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्यात येईल असे प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे वतीने राहुरीचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे प्रमुख चंद्रकांत कराळे, देवळाली प्रवरा शहर प्रमुख प्रकाश वाकळे, राहुरी फॅक्टरी महिला शहर प्रमुख रजनीताई कांबळे, देवळाली प्रवरा शहर संपर्क प्रमुख गणेश भालके, शहर संघटक प्रभाकर कांबळे आदी उपस्थितीत होते. राहुरीचे तहसीलदार साहेब यांच्या वतीने निवासी नायब तहसीलदार संध्या दळवी मॅडम यांनी निवेदन स्वीकारले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी आणि विविध समाज घटकांच्या अनेक मागण्या घेऊन ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू, संस्थापक अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष हे राष्ट्रसंतांच्या समाधीस्थळी गुरुकुंज मोझरी येथे मागील पाच दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या मागण्या अतिशय रास्त असून त्या सर्वसामान्य लोकांच्या हिताच्या आहेत. परंतु राज्य सरकार हे निगरगट्ट झाले असून त्यांना सर्वसामान्य माणसांच्या समस्या, अडचणी व प्रश्नांसोबत काही घेणेदेणे राहिलेले नाही. त्यामुळे सध्या शेतकरी बांधव आणि सर्वसामान्य जनता अतिशय त्रस्त असून सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे आणि जनता सरकार विरोधात संताप व्यक्त करीत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व कार्यकर्तेसुद्धा सरकारच्या या जनविरोधी भूमिकेविरुद्ध महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन करून आवाज उठवत आहे.
सामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी बच्चूभाऊंनी घेतलेल्या निर्णयाला आमचे समर्थन असून सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधातील त्यांच्या जनआंदोलनाला श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील तमाम प्रहार कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलनाला जाहीर पाठिंबा असून सरकारने भाऊंच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात ही विनंती. अन्यथा श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रहार कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदनात शेवटी म्हटले आहे.



