स्वराज न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर e-KYC ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
ही प्रक्रिया मोबाईलवरूनही सोप्या पद्धतीने करता येईल. पुढील दोन महिन्यात ही प्रक्रिया लाभार्थ्यांनी पूर्ण करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. या प्रक्रियेमुळे भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य-पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) द्वारे आर्थिक सहाय्य दिले जाते.
महिला व बाल विकास विभागाकडून e-KYC माध्यमातून लाभार्थींचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, महिला स्वत:च्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया पूर्ण करू शकतील अशी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यासंदर्भात आर्थिक मागणी करीत असेल त्यास लाभार्थींनी बळी पडू नये असे आवाहनही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.
26.34 लाख अपात्र लाभार्थी –
मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, योजनेत सुमारे 26.34 लाख अपात्र लाभार्थी आढळले आहेत, ज्यामध्ये पुरुषांचाही समावेश आहे. सध्या या योजनेत 2.25 कोटी महिला नोंदणीकृत आहेत. अपात्र लाभार्थ्यांना रोखण्यासाठी आणि सार्वजनिक निधीचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी सरकारने सत्यापन प्रक्रिया कडक केली आहे. यामुळे पात्र महिलांना योजनेचा लाभ सातत्याने मिळेल आणि भविष्यात इतर सरकारी योजनांशी जोडणी करणेही सुलभ होईल.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा