
स्वराज न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर : शहरातील अवैध मटका जुगार व्यवसायावर पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत दोन मुख्य मटका बुकींसह एकूण २२ आरोपींना अटक केली आहे. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. याच पथकाचे नेतृत्व परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी केले. त्यांनी २७ जून रोजी श्रीरामपूर शहरातील मुळा प्रवरा वीज सोसायटीजवळ काही इसम मटका जुगाराची बुकींग घेत असल्याची खात्रीशीर माहिती मिळवून शहर पोलीस ठाण्याच्या स्टाफसह छापा टाकला. या कारवाईत मुख्य मटका बुकी मुनीर इमाम पठाण (५५, रा. सुभेदार वस्ती) आणि अभिजीत ऋषभ मुथा (४०, रा. बेलापूर रोड) यांच्यासह सादीक शेख, आकाश पोटे, अवधूत शिंदे, लालजीत यादव, संदीप सूर्यवंशी, सचिन गावडे, सागर बनगे, शाहरुख चांदखास, किसन शिंदे, महेश पवार, विक्रांत लोखंडे, राहुल चौधरी, ललीत तांबे, राजू ताभाडे, मंजूर सय्यद, ख्वाजा पठाण, स्वप्नील तांबे, नामदेव गोंधरे, नसरुद्दीन शेख आणि अल्ताफ शेख या इतर २० जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
पोलिसांनी पंचासमक्ष केलेल्या तपासणीत त्यांच्याकडून एकूण ८,६१,५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये १,३३,२६० रुपये रोख रक्कम, २,२४,३०० रुपये किमतीचे मोबाईल फोन, ४,८०,००० रुपये किमतीची वाहने, २४,००० रुपये किमतीचा प्रिंटर आणि मटका जुगार खेळण्याचे साहित्य यांचा समावेश आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६२८/२०२५ नुसार महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक वैभव कल्बमें (श्रीरामपूर विभाग), प्रशांत खैरे व उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईसाठी पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पोसई राजेंद्र वाघ, सफो शकील शेख, पोहेकॉ शंकर चौधरी, अजय साठे, अरविंद भिगारदिवे, मल्लिकार्जुन बनकर, दिनेश मोरे, उमेश खेडकर, सुनिल पवार, तसेच पोकॉ सुनिल दिघे, अमोल कांबळे, विजय ढाकणे, दीपक जाधव, जालिंदर दहिफळे यांच्या पथकाने सहभाग घेतला. यावेळी शहरातील गांधी पुतळा ते भगतसिंग चौक, गिरमे चौक ते शिवाजी चौक, शिवाजी चौक ते सय्यद बाबा चौक व वॉर्ड क्र. २ या परिसरात रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यात आली व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील मटका जुगारावर मोठा आळा बसला असून, नागरिकांनी पोलिस प्रशासनाचे कौतुक केले आहे. या प्रकारच्या अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
कारवाईचा व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा



