आरोग्य व शिक्षण
एकलव्य विद्यालयांमध्ये 38,800 शिक्षकांची नियुक्ती
157 नवीन नर्सिंग कॉलेज होणार सुरू; केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा
स्वराज न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पुढच्या 3 वर्षांत केंद्राकडून 38,800 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी भरती करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (बुधवार) देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
शिक्षक प्रशिक्षक कार्यक्रमाव्यतिरिक्त देशात 157 नवीन नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय नॅशनल डिजिटल लायब्ररी पंचायत आणि वॉर्ड स्तरापर्यंत उघडल्या जातील. या ग्रंथालयांमध्ये प्रादेशिक भाषांमधील तसेच इंग्रजी भाषेतली पुस्तकं उपलब्ध करून दिली जातील. एनजीओंना सोबत घेऊन देशातल्या लोकांच्या साक्षरतेवर काम केले जाईल.
एकलव्य विद्यालयांमध्ये 38,800 शिक्षकांची नियुक्ती
पुढील तीन वर्षांमध्ये एकलव्य विद्यालयांच्या माध्यमातून 38 हजार 800 शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. या शाळांमधून साडेतीन लाख आदिवासी मुलांना शिक्षण दिले जाणार आहे.
मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प
सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेच्या पटलावर मांडण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सहभागी झाल्या. या बैठकीत त्यांनी अर्थसंकल्पाबद्दल चर्चा केली. हा अर्थसंकल्प मोदी सरकारसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण पुढच्या वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.