ब्रेकिंग
गोमांस विक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल
नेवासा तालुक्यातील घटना; नेवासा पोलिसांची कारवाई

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : गुप्त खबऱ्या द्वारे मिळालेल्या माहितीवरून नेवासा पोलिसांनी केलेल्या कारवाईत तालुक्यातील सलाबतपुर येथे एक महिला गोमांस विक्री करताना आढळून आल्याने तिच्यावर गोमांस विक्री कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली विस्तृत माहिती अशी की शुक्रवार (दि. 30 मे) रोजी पोलीस ठाणे नेवासा प्रभारी अधिकारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे सलबतपुर ता. नेवासा येथील कुरेशी मोहल्यात गोमांस विक्री होत आहे.
खात्रीलायक माहिती मिळाल्याने खाडे यांनी तात्काळ पोलीस पथकाला सदर माहितीचा थोडक्यात आशय सांगून रवाना केले असता सदर पोलीस पथक व पंच असे कुरेशी मोहल्ला, सलबतपुर या ठिकाणी गेले असता तेथे एक बाई खाली बसून तिचे समोर दोन-तीन इसम उभे असल्याचे दिसले. सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर बाई गोमांस विक्री करत असल्याचे आढळून आल्याने सदर बाईस तिचे नाव गाव विचारले असता तिने तिचे नाव रियानबी यासीन शेख वय 52 वर्ष रा. सलबतपुर ता. नेवासा असे सांगितले.
सदर महिलेचे महिला पोलीस व महिला पोलीस पाटील यांचे समक्ष झडती घेतली असता तिचे अंदाजे 6,500 /- रुपये किमतीचे गोमांस मिळून आले. सदर गोमांस पंचासमक्ष जप्त करून सदर महिलेविरुद्ध पोलीस ठाणे नेवासा येथे प्रचलित कायद्यान्वये महिला पोलीस कॉन्स्टेबल भारती पवार यांचे फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरचे कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, पोलीस हवालदार अजय साठे, पोलीस कॉन्स्टेबल आप्पा तांबे, श्रीनाथ गवळी, अवि वैद्य, गणेश जाधव, महिला पोलीस कॉन्स्टेबल भारती पवार, पोलीस पाटील रजिया शेख यांनी केली आहे.