google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

पत्नीच्या खुनाचा प्रयत्न; पतीस 7 वर्षे कारावास

दीड लाख रुपये दंड; सत्र न्यायालयाचा निकाल नेवासा येथील घटना

                                  स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : स्वतःच्या पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीस नेवासा येथील सत्र न्यायाधीशांनी ७ वर्ष सश्रम कारावास व १.५ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सदर घटना २० मे २०१८ रोजी रात्री नेवासा येथे घडली होती.
                 या घटनेची हकीकत अशी की, आरोपी पती अजय उर्फ बाळासाहेब सुगंध चक्रनारायण (रा. तहसील कार्यालयाजवळ, नेवासा खुर्द ता. नेवासा जि. अहमदनगर) याने दि. २० मे २०१८ रोजी रात्री जेवण झाल्यानंतर सुमारे ११.३० वाजता पत्नी अनिता, मुलगा अनिकेत व मुलगी अंजली हे गाढ झोपेत असताना चारित्र्याचा संशय घेऊन अनिताच्या डोक्यात व माने जवळ कुऱ्हाडीने वार केले. यावेळी अनिताचा ओरडण्याचा आवाज ऐकून दोन्ही मुले जागी झाली. तेव्हा वडील आईला कुऱ्हाडीने मारहाण करून खुनाचा प्रयत्न करीत असल्याचे पाहून मुलगा अनिकेत याने वडिलांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावर आरोपी अजय याने स्वतःच्या मुलाच्या पायावर कुऱ्हाडीने वार केला व मुलगी अंजली ही बचावासाठी आली असता तिला मारहाण केली व पुन्हा पत्नीवर कुऱ्हाडीने वार केला. त्यामुळे पत्नी जागेवरच बेशुद्ध झाली. 
          दरम्यान, आरडाओरड झाल्याने शेजारील लोक जमा झाले. त्यांनी जखमींना गाडीत घालून औषधोपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय, नेवासा फाटा येथे दाखल केले. अनिता ही गंभीररित्या जखमी असल्याने व तिच्या जिवितास धोका निर्माण झाल्याने डॉक्टरांनी तिला नगर येथे हलविण्यास सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी तिला नगरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे तिच्यावर तात्काळ शस्त्रक्रीया करण्यात आल्याने तिचा जीव वाचला. 
             जखमी अनिताने दि. २५ मे २०१८ रोजी पोलिसांना जबाब दिल्याने आरोपीविरुद्ध नेवासा पोलीस स्टेशनला भा.दं.वि. कलम ३०७, ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सदर गुन्ह्याचा तपास होऊन नेवासा पोलीस स्टेशनने दोषारोपपत्र कोर्टात दाखल केले.
             
              या खटल्यात चौकशीकामी सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात फिर्यादी, डॉक्टर व जखमी साक्षीदार यांचे जबाब व पुरावा महत्त्वाचा ठरला. सरकारपक्षातर्फे सादर साक्षीपुरावे व युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस दोषी धरून शिक्षा सुनावली.
                या गुन्ह्यात आरोपी अजय यास न्यायालयाने भादंवि कलम ३०७ अन्वये ७ वर्ष सश्रम कारावास व रक्कम रुपये १ लाख ५० हजार इतकी दंडाची तसेच भादंवि कलम ३२४ अन्वये २ वर्षे कारावास व कलम ५०४ अन्वये ३ महिने कारावास व भादंवि कलम ५०६ अन्वये २ वर्षे कारावास व रुपये ५ हजार इतकी दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी १ लाख रुपये फिर्यादीला व ४५ हजार रुपये जखमी साक्षीदारास देण्याचे आदेश केले आहेत.
          या खटल्यात सरकारपक्षातर्फे अति. सरकारी वकील मयुरेश नवले यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी पो. कॉ. सुभाष हजारे, पैरवी अधिकारी पो. कॉ. बाळासाहेब बाचकर, पो. कॉ. नवगिरे, पो. हे. कॉ. आर. एस. काळे, पो. कॉ. एस. एम. म्हस्के, पो. कॉ. आर. एस. पवार यांचे सहकार्य लाभले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!