google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्र

मोदी आवास घरकुल योजना

अशी आहे योजना; अशी असेल लाभार्थी पात्रता; आवश्यक कागदपत्रे

                                   स्वराज न्यूज नेटवर्क 

“सर्वांसाठी घरे-2024” हे शासनाचे धोरण असून, त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना सन 2024 पर्यंत स्वत:चे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न शासनाचा आहे. त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत.

              शासनामार्फत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल योजनाचा लाभ देण्यासाठी रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदीम आवास योजना तसेच विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व धनगर आवास योजना आहेत. तथापि, इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्याकरीता अशा प्रकारची कोणतीही योजना अस्तित्वात नव्हती त्यामुळे इतर मागास प्रवर्गातील घरकुलास पात्र लाभार्थी वंचित राहत होते.

               यामुळे राज्य शासनाने सन 2023-2024 या वर्षांचा अर्थसंकल्प सादर करतांना राज्यात इतर मागास वर्गासाठी 3 वर्षांत 10 लाख घरे पूर्ण करण्यासाठी ‘मोदी आवास घरकुल योजना’ सुरु करण्याची घोषणा केली आहे. त्याअनुषंगाने इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी  येत्या तीन वर्षांत 10 लाख घरे बांधण्यासाठी नवीन ‘मोदी आवास घरकुल योजना’ राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

अशी आहे योजना

              राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील आवास प्लस मधील प्रतिक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी, आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु ऑटोमॅटीक सिस्टिमद्वारे रद्द झालेले पात्र लाभार्थी, जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

              वरील नमूद मधून उपलब्ध झालेल्या इतर मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थींना नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रुपांतर करण्यासाठी 1 लाख 20 हजार अर्थसहाय्य देण्यात येईल. लाभार्थींना किमान 269 चौ. फूट इतके क्षेत्रफळाचे बांधकाम करणे आवश्यक असेल.

               इतर मागास प्रवर्गातील निवड झालेल्या लाभार्थींना  प्राधान्यक्रमानुसार ग्रामसभेमार्फत निवड करण्यात येवून लाभार्थ्यांची छाननी तालुकास्तरावर गट विकास अधिकारी यांचे मार्फत करुन घरकुलाचे प्रस्ताव जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत निकषानुसार लाभार्थींना निवड केली जाईल.

अशी असेल लाभार्थी पात्रता
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा.
लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्ष असावे.
लाथार्थ्यांचे वार्षिंक उत्पन्न रु.1 लाख 20 हजार पेक्षा जास्त नसावे.
लाभार्थ्यांचे स्वत:च्या अथवा कुटूंबियाच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे.
लाभार्थ्यांकडे स्वत:ची अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे अथवा त्यांचे स्वत:चे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल.
लाभार्थी कुटूंबाने महाराष्ट्र राज्यात अन्यत्र कोठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण गृहकर्ज योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुन्हा योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही.
लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गतच्या कायमस्वरुपी प्रतिक्षा यादीमध्ये समाविष्ट नसावा.

आवश्यक कागदपत्रे
         सातबारा उतारा, मालमत्ता नोंदपत्र, ग्रामपंचायतमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा अथवा अथवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत, आधारकार्ड, स्वेच्छेने दिलेल्या आधारकार्डची प्रत, रेशनकार्ड, निवडणुक ओळखपत्र, विद्युत बिल, मनरेगा जॉब कार्ड लाभार्थींच्या स्वत:च्या नावे वापरात असलेल्या बचत खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत.

            प्राधान्यक्षेत्र लाभार्थींची यादी करतांना ग्रामसभेने घरात कोणीही कमवत नाही अशा विधवा, परितक्त्या महिला, कुटूंब प्रमुख, पूरग्रस्त क्षेत्रामधील लाभार्थी अथवा पिडीत लाभार्थी, जातीय दंगलीमुळे घराचे नुकसान (आग व इतर तोडफोड) झालेली व्यक्ती, नैसर्गिक आपत्तीबाधीत व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती उद्दिष्टाच्या किमान 5 टक्के उद्दिष्ट दिव्यांगाकरीता राखीव ठेवणे आवयश्क आहे. इतर पात्र कुटुंबे यांना ग्रामसभेने प्राधान्य क्षेत्र देण्यात येणार आहे. घराच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार राज्य व्यवस्थापक कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाकडून ठरवून दिलेले बांधकाम पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे निधी लाभार्थींच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल.

              घरकुल योजनेंतर्गत राज्य शासनाने घोषित केलेल्या  डोंगराळ, दुर्गम भाग क्षेत्रामध्ये घरकुल बांधकामाकरीता प्रति घरकुल 1.30 लक्ष व सर्वसाधारण क्षेत्राकरीता प्रति घरकुल 1.20 लक्ष अर्थसहाय्य देय राहील. तसेच प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण योजनेप्रमाणे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना मनरेगा अंतर्गत अनुज्ञेय असलेले अनुदान 90/95 दिवस अकुशल मजुरीच्या स्वरुपात अभिसरणाद्वारे अनुज्ञेय राहील. तसेच शौचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देय असलेले 12 हजार प्रोत्साहनपर अनुदानास देखील लाभार्थी पात्र असेल. इतर मागास प्रवर्गातील ज्या पात्र लाभार्थ्यांकडे घरकुल बांधकामाकरिता स्वत:ची जागा उपलब्ध नाही. असे लाभार्थी योजनेच्या  लाभापासून वंचित राहू नये, याकरीता सदर लाभार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतर्गत 500 चौ.फुट जागेपर्यत 50 हजार पर्यंत अनुदान देय राहील. तसेच इतर मागास प्रवर्गा व्यतिरिक्त अन्य प्रवर्गातील पात्र लाभार्थी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतंर्गत प्रचलित असलेल्या तरतुदीनुसार लाभ मिळण्यास पात्र असेल.
(संदीप गावीत, उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय, धुळे)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!