google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर कारवाई करा

नेवासा आम आदमी पार्टीचा आंदोलनाचा इशारा; शासन आदेशाची पायमल्ली करुन बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक

                                     स्वराज न्यूज नेटवर्क      
नेवासा : राज्य सरकारचा आदेश डावलून सिबिल स्कोअर पाहून शेतकऱ्यांना पिक कर्ज नाकारुन अडवणूक करणाऱ्या तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांवर कठोर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे.
                  यासंदर्भात आम आदमी पार्टीने नेवासा नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिक कर्जाची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची सिबिल स्कोअरच्या नावाखाली राष्ट्रीकृत बँकांनी अडवणूक करु नये अशी तंबी राज्य सरकारने दिली असून तसे करणाऱ्या बँकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मात्र तरीही तालुक्यातील बहुतांश राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांतून सिबील स्कोअरचे कारण देऊन शेतकऱ्यांना सर्रास पिक कर्ज नाकारण्यात येत असल्याच्या गंभीर तक्रारी वाढल्या आहेत. ही बाब गंभीर असून सरकारी आदेशाची पायमल्ली करणारी आहे. पिक कर्ज मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क असताना त्यांना यापासून वंचित ठेवण्याचा हा अन्यायकारक प्रकार आहे. राष्ट्रीकृत बँका पीक कर्ज नाकारत असल्याने हतबल बनलेल्या शेतकऱ्यांवर नाईलाजाने खाजगी सावकारांचे उंबरठे झिजवण्याची दुर्दैवी वेळ ओढवली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास तालुक्यातील बहुतांश शेतकरी खाजगी सावकारांच्या दुष्टचक्रात गुरफटून भविष्यात त्यांच्यावर कर्जबाजारीपणापायी आत्महत्येची दुर्दैवी वेळ ओढवण्याची भीती ‘आप’ने व्यक्त केली आहे.
              नेवासा तालुक्यातील सर्वच राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखाधिकाऱ्यांना शासन आदेशाचे पालन करुन सिबील स्कोअरच्या नावाखाली शेतकऱ्यांची अडवणूक न करता त्यांना पिक कर्जाचे तातडीने वितरण करण्याचे आदेश करण्याची मागणी ‘आप’ने या निवेदनाद्वारे केली असून येत्या आठ दिवसांत तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांतून शेतकऱ्यांचे सिबील न पाहता त्यांना पिक कर्जाचे वितरण सुरळीत न झाल्यास संबंधित बँकांच्या शाखांमध्ये संबंधित वंचित शेतकऱ्यांसह जाऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. 
           नेवासा आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष अॅड. सादिक शिलेदार, सचिव प्रवीण तिरोडकर, उपाध्यक्ष देवराम सरोदे, अण्णासाहेब लोंढे, किरण भालेराव, शहराध्यक्ष संदीप आलवणे, अल्पसंख्यांक आघाडीचे सलीम सय्यद, विठ्ठल मैंदाड, करीम सय्यद, विठ्ठल चांडे, सुमित पटारे, मुन्नाभाई आतार, राजू महानोर आदींच्या सह्या आहेत. 
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!