… तर नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई
पतंगबाजीतील नायलॉन धागा बंदी; प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या नाशिक विभागीय आयुक्तालयाच्या सूचना
नाशिक विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त रमेश काळे यांनी नाशिक, जळगांव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर या जिल्ह्यात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्त आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना नायलॉन धागा विक्रेते यांचेवर कारवाई बाबत लेखी सूचना दिल्या आहेत. मकरसंक्रांत निमित्ताने पतंगबाजी करुन उत्सव साजरा केला जातो. आपलाच पतंग दिर्घकाळ हवेत राहावा या स्पर्धेतून गत 15 वर्षापासून नायलॉन धागा वापरण्यास पतंगोत्सवात सुरूवात झाली आहे. यामुळे मनुष्य, पशु-पक्षी यांना गंभीर शारीरिक इजा तथापि काही ठिकाणी जीव गमविण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत.
पतंगासह ते सर्व तुटलेले नायलॉन मांजाच्या धाग्याचे तुकडे जमिनीवर पडतात. हे तुकडे विघटन होण्याजोगे नसल्याने गटारे व नदी-नाल्यासारख्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण करतात, तसेच गाय अथवा तत्सम प्राण्यांनी नायलॉन मांजाचे तुकडे समाविष्ट असलेले खाद्य सेवन केल्यामुळे त्यांना गुदमरण्याचा त्रास होतो. अशाप्रकारे सदर धाग्यामधील मांज्यामधील प्लास्टिकच्या वस्तुमुळे विविध प्रकारचे दुष्परिणाम होतात.
नायलॉन बंदीची जनजागृती करतांना शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नायलॉन बंदीबाबत सार्वजनिक शपथ देण्यात यावी. अनेक वर्षांपासून पतंग उत्सवाचे आनंदी स्वरूप कायम रहावे. या करिता सर्व नागरिकांनी जागरूक राहून मकरसंक्रांतीचा पारंपरिक पतंग उत्सवाचा आनंद टिकवावा. नायलॉन धागा (मांजा) उत्पादक कारखाने व विक्रेते यांचेवर बंदी आणून त्याचा उपयोग योग्य कारणासाठीच होणेकामी विशिष्ट नियमावली आखून त्याचे प्रशासनामार्फत काटेकोर पालन व्हावे. अशा सूचना ही उपायुक्त काळे यांनी लेखी पत्राद्वारे दिल्या आहेत.