गुन्हेगारी
गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह एक जेरबंद
नेवासा शहरातील घटना; आई, पत्नी, तसेच मुलींना जीवे मारण्यासाठी खरेदी केला गावठी कट्टा
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : आई, पत्नी, तसेच मुलींना जीवे मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवकाला गावठी कट्टा व नऊ जिवंत काडतुसांसह जेरबंद करण्यात नेवासा पोलिसांना यश मिळाले आहे.
नेवासा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दि. 17 जानेवारी रोजी रात्री दहा ते साडेदहा वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशनला हजर असताना पोनि विजय करे यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल गिते, पोना दहिफळे, पोकॉ शाम गुंजाळ व पोकॉ रामदास वैद्य असे सर्वांना कळविले की लताबाई किशोर कुंभकर्ण (रा औदुंबर चौक, पोस्ट ऑफिससमोर नेवासा खुर्द ता नेवासा) यांना त्यांचा मुलगा सागर कुंभकर्ण हा त्यांना व त्यांची सून प्रांजल तसेच नात श्रेषा, माही, श्रावणी या सर्वांना विनाकारण लाथाबुक्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देत आहे. तरी तुम्ही सदर ठिकाणी जावुन सदर पिडीत महिला व इसमांस घेवून पोलीस स्टेशनला या व त्याचेवर कायदेशीर कार्यवाही करा. आदेश दिलेवरुन पोहेकॉ गिते , पोना दहिफळे पोकॉ शाम गुंजाळ , पोकॉ वैद्य असे सदर ठिकाणी गेले असता सागर कुंभकर्ण यास ताब्यात घेतले व त्याची आई लताबाई यांना तक्रार देण्यास पोलीस स्टेशनला येण्यास कळविले.
पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर पोनि विजय करे यांनी सागर यास विश्वासात घेवून त्याचेकडे विचारपुस केली असता, त्याने पोलिसांना सांगितले की, मला माझी आई , पत्नी व मुली हे कायम त्रास देतात. मी त्यांचा कायमचा काटा काढण्यासाठी एक गावठी कटटा व जिवंत काडतुसे विकत घेतलेले असून त्यांना मी ठार मारणार आहे. सदर गावठी कटटा व जिवंत काडतुसे मी माझे घराचे तिस-या मजल्यावरील कपाटात लपवून ठेवलेली आहेत.
पो.नि करे , पोहेकॉ गिते, पोना दहिफळे, पोकॉ शाम गुंजाळ, पोकॉ वैद्य व सागर असे सर्वजण सरकारी गाडीने त्याचे राहते घराजवळ गेले. तेथे पोहेकॉ गिते यांनी दोन पंचांना बोलावून त्यांना सागर कुंभकर्ण याने सांगितल्याप्रमाणे त्याचे घराचे तिस-या मजल्यावरील लाकडी कपाटामधील ड्रावरमधून एक गावठी कट्टा व 9 जिवंत काडतुसे काढुन दिल्याने लागलीच जप्त केले.
पोलीस कॉन्स्टेबल शाम गुंजाळ यांच्या फिर्यादीवरुन सागर कुंभकर्ण याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्यांत सागर कुंभकर्ण याला अटक करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि विजय करे, पोहेकॉ तुळशीराम गिते, पोना प्रतापसिंह दहिफळे, पोकॉ शाम गुंजाळ, पोकॉ रामदास वैद्य यांनी केली असून पुढील तपास पोहेकॉ तुळशीराम गिते हे करीत आहेत.