google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नेवासा तालुक्याला पावसाचा तडाखा

ओढ्या-नाल्यांना पूर; सोनईमध्ये रस्त्यावरील दुकानात पाणी; शनिमंदिर परिसरही पाण्याखाली; तिघांचा मृत्यू

                                    स्वराज न्यूज नेटवर्क 

नेवासा : नेवासा तालुक्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शनिवार दुपारनंतर विविध गावांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली तर रविवार (दि 28) रोजी पहाटे नेवासा तालुक्यात ढगफुटी दृश्य पाऊस झाल्याने घरांसह शेती पिकांचे, दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गोदावरी, मुळा आणि प्रवरा नद्यांना आलेल्या प्रचंड पुरामुळे संपूर्ण तालुक्यात हाहाकार माजला आहे. या आपत्तीत तीन जणांचा मृत्यू झाला असून शेतकरी, व्यापारी व जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू केले आहे.

      धरणसाठ्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्याने नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. गोदावरीतून ७९,५४१ क्यूसेक, मुळेतून २५,००० क्यूसेक आणि प्रवरेतून २४,५०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले. परिणामी पाचेगाव, पुनतगाव व मधमेश्वर (नेवासा) बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सोनईची कौतुकी नदी पात्र सोडून थेट बाजारपेठेत घुसल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शहरालगतचे दगडी फुल ओढा, काझी नाला, खुपटीचा लेंडगा नाला यांसह सर्व ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पूरस्थितीमुळे १४२ कुटुंबांतील ६५९ व्यक्तींना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले असून, त्यांच्यासाठी १९ निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत

          सोनई गावात विविध भागांतील घरात पाणी शिरले. कौतुकी नदीला पूर आल्याने मुख्य बाजारपेठेला ओढ्या-नाल्यांचे स्वरूप आले होते. सोनई येथील सय्यदनगर, ओमशांती नगर, लक्ष्मीनगर या भागातील अनेक घरांत पाणी शिरले होते. बस स्थानक परिसर, संभाजी चौक, शिवाजी चौक, विवेकानंद चौक या ठिकाणी दुकानात पाणी शिरल्याने भरपूर नुकसान झाले आहे. धनगरवाडी येथील तलाव व मोरेचिंचोरे येथील तलाव भरल्याने पुढील कोसळणारा पाऊस परिसरामध्ये आणखीन भयानक परिस्थिती निर्माण करू शकण्याची शक्यता आहे.

              तालुक्यात मानवी जीवितहानीची नोंद झाली असून चिलेखनवाडी येथे पिराजी भीमराव पिटेकर (८०) यांचा भिंत अंगावर पडून मृत्यू झाला. नेवासा खुर्द येथे शकील रफिक शेख यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला तर जैनपूर येथे संकेत भाऊसाहेब पंढरी यांचाही मृत्यू झाला. भानस हिवरा येथे लक्ष्मीबाई भास्कर साळुंखे (७१) व मयूर शाम साळुंखे (२३) हे भिंत कोसळल्याने जखमी झाले आहेत.
                जनावरांचेही मोठे नुकसान झाले असून ५ गायी व १० शेळ्या पूर पाण्यात व ढासळलेल्या भिंतीखाली अडकून मृत्यूमुखी पडल्या.

        शनिशिंगणापूर येथील पानसनाल्याला पूर आल्याने शनी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरले आहे. घोडेगाव, मुळाथडी परिसरातील अंमळनेर, पानेगाव या भागातील सर्व रस्ते दलदलीने व पाण्यामुळे बंद झाले आहेत. पाचेगाव येथील प्रवरा नदीवरील पाचेगाव -गोणेगावला जोडणाऱ्या पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे. नेवासा-राहुरी रस्त्यावरील खुपटी येथील पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. 

             नेवासा शहर परिसरातील रानमळा हंडीनिमगाव, नेवासा, खुपटी, उस्थळ रोडवरील पुलावरून वाहत्या पाण्यातून जीव धोक्यात घालून नागरिक प्रवास करतानाचे चित्र बघावयास मिळाले. या पावसाने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

             शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला असून कपाशी व सोयाबीन पिके पाण्याखाली गेल्याने हाती आलेला घास हिरावून गेला आहे. शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!