गुन्हेगारी
नेवासा तालुक्यात गावठी कट्टे विक्री
दोन गावठी कट्टे, रिव्हॉल्वर व पाच जिवंत काडतुसासह आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 86 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
स्वराज न्यूज़ नेटवर्क
नेवासा : नेवासा तालुक्यात विक्रीच्या उद्देशाने दोन गावठी कट्टे, एक सिंगल बोर गावठी रिव्हॉल्वर व पाच जिवंत काडतुसासह एका 22 वर्षीय तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई फाटा येथे जेरबंद केले.
याबाबत माहिती अशी की, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.
जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली की, आकाशी रंगाचा गोल गळ्याचा टी शर्ट घातलेला एक इसम गावठी कट्टे व जिवंत काडतसे विक्री करण्यासाठी शिंगवे तुकाई फाटा, ता. नेवासा परिसरात येणार आहे. आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सफौ भाऊसाहेब काळे, पोहेकॉ विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, फकिर शेख, पोना शंकर चौधरी, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, लक्ष्मण खोकले व चापोना भरत बुधवंत अशांनी मिळून मिळालेल्या बातमीचे ठिकाणी शिंगवे तुकाई फाटा, ता. नेवासा येथे जावून सापळा लावून थांबलेले असतांना थोड्याच वेळात एक संशयित इसम हातामध्ये एक कापडी पिशवी घेऊन शिंगवे तुकाई फाट्याजवळील कमानी जवळ उभा राहून आजुबाजूस संशयित नजरेने पाहतांना दिसला.
पोलीस पथकाची खात्री झाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी संशयित इसमास ताब्यात घेवुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने नाव शुभम सुभाष सरोदे (वय 22) रा. गुंजाळ, ता. राहुरी असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे हातातील पिशवीमध्ये दोन गावठी बनावटी कट्टे, एक सिंगल बोर गावठी रिव्हॉल्वर व पाच जिवंत काडतूसे असा एकूण 86 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरचे पोना संदीप दरंदले यांनी सोनई पोस्टे येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर व संदीप मिटके यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.