स्वराज न्यूज़ नेटवर्क
नेवासा : भूलोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या नेवासा तालुक्यातील गुरुदेव दत्तपीठ श्री क्षेत्र देवगड येथे श्री दत्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने लाखो भाविकांनी भगवान दत्तात्रयांचे दर्शन घेतले. यावेळी दिगंबरा..दिगंबरा..श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात देवगड नगरी दुमदुमली होती.
सायंकाळी 6 वाजता गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी व शंखनाद करून भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी झालेल्या दत्त जन्म सोहळयाच्या प्रसंगी गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज, उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात आली. जन्म सोहळ्याचे पौरोहित्य वेदशास्त्रसंपन्न आचार्य शरदगुरू काटकर व भेंडा येथील आचार्य गणेशदेवा कुलकर्णी यांनी केले.
यावेळी नेवासा येथील गायिका माधुरी कुलकर्णी यांनी श्रीदत्त जन्माचा पाळणा म्हटला. त्यांना डॉ. मेधा करवंदे, संगिता शिंदे, शारदा घुले, जयश्री शिंदे यांनी साथ संगत केली.