google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

संतोष खाडे यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण

जिल्हा पोलिसांकडून सन्मानपूर्वक निरोप; पुढील ट्रेनिंगसाठी खाडे रवाना

                                       स्वराज न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर : जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर धडाकेबाज कारवाई करत प्रचंड दहशत निर्माण करणारे प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांचा प्रशिक्षण कालावधी १९ जुलै रोजी पूर्ण झाला. त्यांच्या या उल्लेखनीय सेवेसाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने त्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. 
            संतोष खाडे यांना पोलीस उपअधीक्षक पदाच्या प्रशिक्षणासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात नियुक्त करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांनी नेवासा पोलीस ठाण्यात तीन महिन्यांचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकात एक महिन्याचे विशेष प्रशिक्षण त्यांनी पार पाडले. अहिल्यानगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठा जिल्हा मानला जातो. येथे अवैध धंद्यांचे प्रमाण मोठे असून, कारवाई करताना अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते.
         अशा कठीण परिस्थितीतही संतोष खाडे यांनी जिल्ह्यातील अनेक अवैध धंद्यावर, सुगंधी तंबाखू व मावा उत्पादकांवर, जुगार अड्ड्यांवर तसेच बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली. त्यांच्या या कामगिरीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांचे मोठे कौतुक झाले. १९ जुलै रोजी झालेल्या निरोप समारंभात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उप अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व अमोल भारती यांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला. खाडे यांचे उर्वरित दोन महिन्यांचे प्रशिक्षण आता इतर जिल्ह्यात होणार आहे. त्यानंतर एकूण सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्ती होणार आहे.

एका महिन्यात ५८ गुन्हे दाखल, २६९ आरोपी जेरबंद

परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पोलिस पथकाने एका महिन्यात अवैध धंद्यांवर कारवाई करत ५८ गुन्हे दाखल केले असून ५ कोटी ९७ लाख ३ हजार २६३ रुपयांच्या मुद्देमालासह २६९ आरोपींना जेरबंद केले.

सोशल मीडियावरील खाडेंची पोस्ट …..
सर्वांना नमस्कार…
अहिल्यानगर पोलीस दलात गेल्या 06 महिन्यापासून जिल्हा प्रशिक्षण संलग्नतेअंतर्गत काम करत होतो.
आज अहिल्यानगर जिल्ह्यातील कार्यकाळ संपून पुढील ट्रेनिंगसाठी रवाना होत आहे. या कालावधी दरम्यान जे काही काम करू शकलो त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आणि विशेषत: जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथजी घार्गे सर यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आणि दिलेल्या जबाबदारीमुळे करू शकलो.
         त्याचबरोबर काम करताना सोबतचे कर्मचारी व अधिकारी वर्ग विशेषत: नेवासा आणि विशेष पथकातील साथीदार यांच्यामुळे हे शक्य झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं अहिल्यानगर जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी केलेल्या प्रेमामुळे आणि प्रोत्साहनामुळे मी पुढे जाऊ शकलो.
गेल्या सहा महिन्यात मी माझं कर्तव्य बजावत असताना मला माझ्या कामासाठी प्रोत्साहन देणाऱ्या असंख्य पत्रकार बंधू, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, तमाम युवकवर्ग आणि सर्वच घटकांचे मनःपूर्वक आभार मानतो..
आणि आज पुढील प्रशिक्षणासाठी रवाना होत आहे… बरच काही या जिल्ह्यातून घेऊन आणि बरच काही येथे ठेवून…
धन्यवाद भेटू.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!