
स्वराज न्यूज नेटवर्क
मुंबई : महिला व बालविकास विभाग अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडीत पर्यवेक्षकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, अधीक्षक ही पदे भरण्यात येत आहेत. भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने होणार असून, कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या 100 दिवस उद्दिष्टपूर्ती अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील रिक्त पदांची भरती विभाग करीत आहे. परीक्षा केंद्रांवर जॅमर बसविण्यास येणार आहे. सरळसेवा व पदोन्नती प्रकारातील पद भरती प्रक्रिया संदर्भातही कार्यवाही सुरू आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी शासन यंत्रणा सज्ज असून, उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक एबावि-२०२२ /प्र.क्र.०९/ क्र.-६ दिनांक ३० जानेवारी २०२५ नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अहिल्यानगर पूर्व या कार्यालय अंतर्गत येणाऱ्या नेवासा, जामखेड, कर्जत, शेवगाव, श्रीगोंदा या शहरातील नगर पालिका/नगर पंचायत क्षेत्रातील अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे सरळ नियुक्तीने (By Nomination) भरण्यासाठी पात्र स्थानिक रहिवासी असलेल्या महिला उमेदवारांकडून दिनांक १८ फेब्रुवारीपर्यंत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.
अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदाच्या सरळ नियुक्तीसंदर्भात आवश्यक शैक्षणिक पात्रता, अटी व शर्ती या करीता http://ahmadnagar.nic.in या संकेत स्थळावर पद भरतीची सूचना व विहित अर्ज नमुना प्रसिध्द करण्यात आला आहे. सदर वेबसाईटवरुन अंगणवाडी मदतनीस भरतीसाठीचा अर्जाचा नमुना डाऊनलोड करुन अर्ज परिपुर्ण भरुन सर्व कागदपत्रांसह बंद लिफाफ्यात बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अहिल्यानगर पूर्व नागुल बिल्डींग, पहिला मजला, डॉ. घोरपडे हॉस्पीटल जवळ, दिल्ली गेट, अहिल्यानगर ४१४००१ या कार्यालयाच्या पत्यावर कार्यालयीन वेळेत समक्ष किंवा पोस्टाने विहीत मुदतीत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.