ब्रेकिंग
स्थानिकांना मिळणार मोफत ‘व्हीआयपी शनिदर्शन’
'पाचशे रूपयांत शनिदर्शन प्रश्नी' प्रहार आणि देवस्थान ट्रस्टची संयुक्त बैठक संपन्न; शनि मंदिरात सर्व भाविकांना मिळणार समान न्याय; प्रहारच्या मागणीला यश
स्वराज न्यूज नेटवर्क
शनिशिंगणापूर : नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टकडून शनि चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या पाचशे रुपयांच्या विषयावर देवस्थान ट्रस्ट आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेवुन सर्वमान्य तोडगा काढू असे प्रतिपादन आ. शंकरराव गडाख यांनी नुकतेच प्रहार सोबत झालेल्या बैठकीत केले होते. त्यानुसार शनि देवस्थान ट्रस्ट कमिटी व प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकाऱ्यांच्या सोबत संयुक्त बैठकीचे आज आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे, जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अप्पासाहेब ढूस, प्रहार सोशल मीडिया प्रमुख संजय वाघ, प्रहार कामगार सेलचे प्रमुख बाळासाहेब कराळे व शनि शिंगणापूर देवस्थान ट्रस्टकडून शनि दर्शनासाठी घेतल्या जाणाऱ्या पाचशे रुपयांच्या प्रश्नावर झालेल्या बैठकीत देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर , उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे, उपव्यवस्थापक अनिल दरंदले आदी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये परिसरातील स्थानिक नागरिकांना शनि चौथऱ्यावर जाऊन मोफत दर्शन देण्याची मागणी प्रहार जिल्हाप्रमुख अभिजीत दादा पोटे यांनी केली. शनि महाराजांच्या मूर्तीचे पावित्र्य राखण्यासाठी व मूर्तीला स्पर्श न करता भाविकांना तेल अर्पण करण्यासाठी एक तेलकुंडाची निर्मिती करून पाईपद्वारे शनि देवाच्या मूर्तीवर तेल जाण्याची व्यवस्था करावी व शनि मूर्तीभोवती असणाऱ्या चौथर्याची लांबी, रुंदी वाढवून स्त्री असो वा पुरुष कोणाचाही मूर्तीला स्पर्श होऊ नये म्हणून संरक्षण कठडा मूर्तीपासून आणखी दूर करून एकच वेळेस जास्त भाविकांना दर्शन घेण्याची व्यवस्था करण्याचे पोटे यांनी सुचवले. सर्वच भाविकांना चौथर्यावरून दर्शन घेण्याची व्यवस्था करता येणे शक्य असल्याचे बैठकीत सूचना केली.
भाविकांकडून पाचशे सोडुन पंधराशे रुपये घ्यावे त्याबद्दल दुमत नाही. फक्त ते पैसे दर्शनाचे न घेता भाविकांच्या वेळेचे घ्यावे. त्यासाठी चौथरा वाढवून सर्व भाविकांनी त्यावर जावून दर्शन घेण्यासाठी संधी द्यावी. जे भाविक स्वतःचा वेळ वाचविण्यासाठी पैसे देवून दर्शन घेतील त्यांना इतर देवस्थानप्रमाणे मागील दाराने चौथऱ्याच्या पायरीजवळ थेट दर्शन रांगेत सोडावे. जेणेकरून शनि देवासमोर दर्शन करताना सर्व भाविक समान दिसतील आणि त्यामुळे सर्वसामान्य भाविक आणि पैसै देवून दर्शन घेणारा भाविक यांच्या दर्शनात भेदभाव होणार नाही असे प्रहारचे आप्पासाहेब ढूस यांनी चर्चेमध्ये भाग घेताना सांगितले.
शनि देवस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर यांनी सांगितले की परिसरातील स्थानिक भाविकांना मोफत दर्शन देऊ व स्थानिक असल्याचे तपासण्यासाठी आधार कार्ड गृहीत धरून व्हीआयपी दर्शन उपलब्ध करून देऊ व शनि महाराजांच्या मूर्तीवर सर्वांनाच तेल वाहण्यासाठी व शनिमहाराजांचे पावित्र्य राखण्यासाठी एका तेलकुंडाची निर्मिती करू म्हणजे भाविक स्त्री असो अथवा पुरुष त्या तेल कुंडात तेल वाहतील. चौथरा वाढवून घेवून संरक्षण कठडे मूर्तीपासून आणखी दूर करू म्हणजे कुणाचाही हात मूर्तीला लागणार नाही. दर्शन रांगेचे बांधकाम व इतर कामे प्रगतीपथावर असून दोन महिन्यात ते पूर्ण करून भाविकांना सुखद दर्शन देण्याची व्यवस्था आम्ही तात्काळ करणार असल्याचे अध्यक्षांनी व उपस्थित देवस्थान कमिटीतील सदस्यांनी सांगितले.
प्रहार जनशक्ती पक्षाने पुकारलेले आंदोलन होण्याआधीच आ. शंकरराव गडाख यांनी घडवून आणलेल्या समन्वय बैठकीमध्ये चांगले निर्णय झाले असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आ. गडाख व शनि देवस्थान ट्रस्ट कमिटीचे आभार मानले. स्थानिक भाविकांना आधार कार्ड दाखवून कठड्यावर जाऊन दर्शन करण्याची व्यवस्था होणार आहे व दर्शन रांगेतून व्हीआयपी व रांगेतून आलेले भाविक एकाच रांगेतून चौथऱ्याजवळ सोडणार असल्याने शनि भाविकांना हा सुखद धक्काच आहे. या बैठकीत हा सहज तोडगा निघाला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणखी एक यश मिळाले आहे.