ब्रेकिंग
पुनतगांव येथे घरफोडी करणारा आरोपी ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; सुमारे ३ लाख ८८ हजारांची झाली होती चोरी

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : तालुक्यातील पुनतगाव येथे झालेल्या घरफोडी प्रकरणातील एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरने अटक केला आहे. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडलेल्या या चोरीत घरातून सुमारे ३ लाख ८८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली गेली होती.
फिर्यादी नंदराज दगडु शिंदे (वय ६३) यांच्या घराच्या मागील बाजूने उघड्या दरवाजातून प्रवेश करून कपाटातील दागिने आणि रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८७८/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना आरोपी शोधण्यासाठी विशेष पथक तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सपोनि हर्ष भोये यांच्या नेतृत्वाखाली फुरकान शेख, दिपक घाटकर, बाळासाहेब नागरगोजे, रिचर्ड गायकवाड, सोमनाथ झांबरे, किशोर शिरसाठ, बाळासाहेब खेडकर, प्रशांत जाधव महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री थिटे, ज्योती शिंदे यांचे पथक तयार करुन तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारे पथकाने शेवगाव परिसरात छापा टाकला.
सदर छाप्यामध्ये आरोपी सचिन उर्फ काळ्या भाऊसाहेव काळे (वय २२, रा. लखमापुरी, ता. शेवगाव) हा ताब्यात घेण्यात आला. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने हा गुन्हा आपल्या साथीदार राहुल शिरसाठ भोसले (रा. पिंपळवाडी, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्यासोबत केल्याचे सांगितले. राहुल भोसले हा सध्या फरार आहे.
चोरी केलेले सोन्याचे दागिने लखन विजय काळे (रा. शेवगाव) याच्याकडे विक्रीसाठी दिल्याचे आरोपीने सांगितले असून लखन हा देखील फरार आहे. फरार दोन्ही संशयितांचा शोध सुरू आहे. ताब्यात घेतलेला आरोपी सचिन काळे यास नेवासा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास नेवासा पोलीस ठाणे करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.



