ब्रेकिंग
नेवाशात 21 तारखेला महायुतीचाच भगवा
उपमुख्यमंत्री शिंदे यांचा ठाम विश्वास; नेवासा येथे मोठ्या सभेने प्रचाराची सांगता

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : महायुतीच्या नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा नेवासा येथील नगरपंचायत चौकात सभा संपन्न झाली. नगरपंचायत निवडणुकीत उपमुख्यमंत्री यांची ही सभा शहराच्या निवडणुकीतील प्रचारात पहिलीच सर्वात मोठी सभा ठरली आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नगरपंचायत चौकात झालेल्या सांगता सभेत शिंदेंच्या प्रत्येक वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.
यावेळी झालेल्या प्रचार सभेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करणसिंह घुले यांनी करत उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर आमदार विठ्ठलराव लंघे, पंचगंगा उद्योग समूहाचे प्रभाकर शिंदे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, बाबुशेठ टायरवाले, भाजपा उपाध्यक्ष सचिन देसरडा, ऋषिकेश शेटे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय पवार तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी तुमचा लाडका भाऊ आला आहे ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला, मतपेटीत त्यांचा नंबर पहिला. लाडक्या बहिणी योजनेविषयी किती अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करू.
नगरपंचायतमध्ये सत्ता आल्यास नेवासा शहरात चांगले रस्ते, उद्यान, मार्केट तसेच शासकीय जागेवरील राहणाऱ्यांची घरे नियमित करण्याचे आश्वासन देऊन पाच वर्षात नेवासा परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी आश्वासन दिले. 21 तारखेला महायुतीचाच भगवा फडकेल अशी काळ्या दगडावरची भगवी रेष आहे. विरोधकांचा डब्बा गुल झाल्याशिवाय राहणार नाही. नेवासा शहरातील विकासाचा बॅकलॉग संपवण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे ठणकावून सांगत त्यांनी पाणी योजना, अंतर्गत रस्ते, शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी निधी दिल्याचे जाहीर करत त्यांनी महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर करणसिंह घुले यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
मतदानाच्या एक दिवसआधी उपमुख्यमंत्री शिंदे यांची सभा होत असल्याने महायुतीच्या वर्तुळात व नेवासकर जनतेत सभेविषयी कुतूहल निर्माण झाले. नेवासे नगरपंचायत चौकात होणाऱ्या या सभेला लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यामुळे सभा गेमचेंजर ठरू शकते.



