श्रीरामपूरमध्ये भरदिवसा गोळीबाराची घटना
बंटी जहागीरदारांचा हल्ल्यात मृत्यू; शहरात दहशतीचे वातावरण

गोळीबारानंतर जखमी जहागीरदार यांना तातडीने कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांनी हॉस्पिटल परिसरात मोठी गर्दी केली होती. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला.
प्रत्यक्षदर्शींनुसार, दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी अचानक गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी आरडाओरड केल्याने हल्लेखोर घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अज्ञात आरोपींच्या शोधासाठी नाकेबंदी करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. या घटनेमुळे श्रीरामपूर शहर पुन्हा एकदा हादरले असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थितीवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



