नेवासा होमगार्ड कार्यालयाला घाणीचा विळखा
कार्यालयीन काम करताना सहन करावा लागतो त्रास, नेवासा नगरपंचायतचे दुर्लक्ष; परिसर स्वच्छतेची गृहरक्षक जवानांची मागणी
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : ‘स्वच्छ भारत…स्वच्छ शहर’चा नारा देत आपले शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन-प्रशासनाकडून आवाहन करण्यात येऊन शहर स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. मात्र, नेवासा शहराची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य असल्याने विविध आजाराने तोंड वर काढल्यास यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
नेवासा तहसील परिसरात होमगार्ड कार्यालय आहे. या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी विविध बंदोबस्त वाटप व अन्य कार्यालयीन कामकाज चालवले जाते. त्याचबरोबर दर रविवारी साप्ताहिक कवायतीकरिता होमगार्ड जवान उपस्थित असतात. परंतु परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरलेली आहे. आ. शंकरराव गडाख यांचे संपर्क कार्यालय होमगार्ड ऑफिस समोरच आहे. या ठिकाणी कचरा हा अस्ताव्यस्त पसरून रोगाला आमंत्रण देण्याचं काम करीत आहे. शहर स्वच्छतेवर भर असल्याची ओरड स्थानिक प्रशासनाकडून केली जात असली तरी शहरात अनेक ठिकाणी असलेली घाण व कचरा हे स्वच्छतेबाबत किती जागृत आहे हे दाखवून देते.
शहरातील असलेली अस्वच्छता पाहता एखाद्या अन्य संसर्गजन्य आजाराने तोंड वर काढल्यास याचे विपरीत परिणाम हे शहरवासियांना भोगावे लागतील. तेव्हा शासनाच्या लाखो-करोडो रुपयांच्या स्वच्छतेकरिता येणाऱ्या निधीचा काय उपयोग? अन येणारा निधी स्वच्छतेच्या उपाययोजनांवर खर्च न करता तो कोठे खर्ची होतो? हे शहराच्या अस्वच्छतेच्या परिस्थितीवरून स्पष्टच होत आहे.
नेवासा होमगार्ड ऑफिससमोर घाण व अस्वच्छता आहे. परिसरातील लोक येथेच शौचाला बसतात. यामुळे परिसरात दुर्गंधी आहे. साप्ताहिक कवायतीसाठी तीन तास या ठिकाणी आम्हाला थांबावे लागते. येथे उभे राहताच येत नाही एवढी घाण आहे. नगरपंचायत प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी कर्मचारी पाठवून स्वच्छता करावी व उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. -रुक्मिणी सरोदे, महिला होमगार्ड, नेवासा.