गुन्हेगारी
पाच देशी गोवंशीय जनावरांची सुटका
कोतवाली पोलिसांची पेट्रोलिंगदरम्यान कारवाई; 2 लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त
स्वराज न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कोतवाली पोलिसांचे पथक पेट्रोलिंगवर असताना शनिवारी रात्री (दि.24) गोवंशीय जनावरांचा टेम्पो पकडला आहे. कत्तलीसाठी जात असलेल्या पाच गोवंशीय जनावरांची कोतवाली पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे. या कारवाईत 2 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, व्यापारी मोहल्ल्यातील कुरेशी मज्जिदसमोर कत्तल करण्याकरिता गोवंशीय जनावरे आणलेली आहेत. पोलीस निरीक्षक यादव यांनी पेट्रोलिंगवर असलेल्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने कुरेशी मज्जिद जवळ जाऊन (एम.एच 12 एन.एक्स 9426) बोलेरो वाहनाची झडती घेतली. वाहनामध्ये पाच गोवंशीय जनावरे मिळून आल्याने पोलिसांनी वाहन जप्त केले. तसेच, वाहन चालक गौस शेर मोहम्मद कुरेशी (वय 40 वर्ष, रा. नालबंद खुंट, झेंडीगेट, अहमदनगर) याला ताब्यात घेवून चौकशी केली असता जनावरे तौसिफ सादिक कुरेशी (रा. झेंडीगेट) याच्या मालकीची असल्याचे सांगितले. कोतवाली पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी रक्षा अधिनियम सन 1955 चे कलम 5 (ब), 9 सह प्राणी क्लेश प्रतिबंध अधिनियम सन 1960 चे कलम 11 प्रमाणे दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सलीम शेख करीत आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोहेकॉ तनवीर शेख, पोना योगेश भिंगारदिवे, पोना सलीम शेख, पोकाँ अभय कदम, पोकाँ कैलास शिरसाठ, पोकॉ सुजय हिवाळे, पोकॉ संदिप थोरात, पोकॉ अमोल गाढे, पोकाँ सागर मिसाळ, पोकॉ अतुल काजळे यांच्या पथकाने केली.