नेवासा तालुक्यात नाताळ उत्साहात साजरा
विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; ख्रिस्तजन्माच्या ‘गव्हाणी’चे देखावे साकार
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा तालुक्यात नाताळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्यातील सर्व चर्चमध्ये धर्मगुरूंनी उपासना सांगितली. ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. विविध चर्चमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. ख्रिस्तजन्माच्या ‘गव्हाणी’चे देखावे करण्यात आले होते.

नेवासा शहरातील ज्ञान माऊली मंदिर येथे ख्रिस्त जन्माचा सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख धर्मगुरू फा. दिलीप जाधव व सहाय्यक धर्मगुरू फा. अक्षय आढाव यांच्यासोबत फा. विल्सन गायकवाड यांनी पवित्र मिस्सा बलिदान अर्पण केला. यावेळी भाविकांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की धनवानांची दुनिया आणि गरिबांचा भगवान आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जन्मापासून ते अखेरपर्यंत दयनीय जीवन जगून ते दाखवून दिले. आपण इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आधुनिक काळातील एआय अर्थात आर्टिफिशरी इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धी) वरती बोलताना त्यांनी सांगितले की कृत्रिम बुद्धीने देवाचा विसर पडला आहे. या कृत्रिम जगामध्ये एआय मशीनमुळे लोक देव विसरले आहेत. आपण देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगले पाहिजे. देवाने दिलेल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. त्याने आपापसात एकोपा, प्रेम राहील. देवाला आवडेल असे जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करावा.

दरम्यान, काल मंगळवार मध्यरात्री विविध चर्चमध्ये ख्रिस्तजन्मोत्सव फटाक्यांची आतषबाजी करून साजरा केला. विशेष प्रार्थना, उपासना, प्रभुभोजन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सजवलेला ख्रिसमस ट्री, चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करून उल्हासपूर्ण वातावरणात रात्री बारा वाजता प्रभू येशुख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा झाला. यावेळी चर्चमध्ये सेंट मेरीज स्कूलच्या प्राचार्या सिस्टर जोसी, मॅनेजर सिस्टर मारिया, सेंट जोसेफ स्कूलच्या प्राचार्या सिस्टर नव्या, मॅनेजर सिस्टर मौली, समाज विकास समितीच्या सिस्टर रिटा समवेत उत्तम गायकवाड, फिलीप घोरपडे, मिखायल पातारे सर, प्रा. हरीश पंडित, प्रशांत बोर्डे सर, मार्कस बोर्डे, उमेश इंगळे, अविनाश गाढवे, सरपंच राजेंद्र पंडित, बाळासाहेब साळवे, शशिकांत बोर्डे, डॅनियल कोल्हे, बापूसाहेब वाघमारे, पवन वाघमारे, जॉन बोर्डे, संजय बोर्डे, संजय तुपे, बाबासाहेब ठुबे, विलास साळवे, विकास साळवे, संजय गायकवाड, सत्यदान गायकवाड, निलेश पंडित, सतीश खरचंद आदी ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांनी चर्च परिसरात येऊन ख्रिस्ती धर्मियांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या.

नेवासा तालुक्यात ख्रिस्ती समाजाला मोठी जुनी परंपरा आहे. या ठिकाणी सर्व ख्रिस्ती परंपरांची चर्च आहेत. नेवासा येथील ज्ञान माऊली चर्च, वडाळा मिशन येथील फेअरबँक मेमोरियल चर्च तर घोडेगाव येथील ख्रिस्त राजा चर्च या प्रमुख चर्चसह सर्व चर्चमध्ये नाताळनिमित्त उपासना सांगण्यात आली. नाताळनिमित्त आठवडाभरापासून विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध भागात प्रभु येशुच्या जन्माचे देखावे साकारण्यात आले होते. खाद्यपदार्थांचे स्टॉल, सांताक्लॉजच्या वेशभुषा केलेली बालके, सजवलेला ख्रिसमस ट्री अशा उल्हासपूर्ण वातावरणात नाताळ सण साजरा करण्यात आला.
