नेवाशात खोटया गुन्हयाच्या विरोधात सर्वपक्षीयांचा मोर्चा
संजय सुखधान यांच्यावर दाखल कथित गुन्हा; मोर्चाद्वारे निष्पक्ष चौकशीची मागणी; तीव्र आंदोलनाचा इशारा

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा शहरातील सामाजिक कार्यकर्ते संजय सुखधान यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या कथित खोट्या गुन्हयाच्या विरोधात नेवासा शहरात सर्वपक्षीयांनी एकत्र येत सोमवारी तीव्र आंदोलन छेडले. नगरपंचायतीच्या कथित अवैध कारभाराच्या विरोधात सुखधान यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळेच त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी मोर्चा प्रसंगी बोलतांना केला.
पाणीपुरवठा व स्वच्छता यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर खर्च दाखवलेल्या रकमेतील व प्रत्यक्ष कामातील तफावत उघड केल्याने संजय सुखधान यांनी मुख्याधिकाऱ्यांवर थेट आरोप करत कारवाईची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र संबंधित घटना नेवासा बसस्थानक परिसरात घडल्याचे फिर्यादीत नमूद असताना ही नेवासा शहरातील कोणत्याही नागरिकाने ती पाहिली नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे पोलीस स्टेशनच्या अगदी जवळ घटना घडल्याचा दावा असून ही पोलिसांना त्याची माहिती कशी मिळाली नाही, तसेच घटना १३ एप्रिलची असताना फिर्याद १८ एप्रिल रोजी अहिल्यानगर येथील तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये का दाखल करण्यात आली याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.
कथित बनावट गुन्ह्याच्या निषेधार्थ नेवासा शहर पूर्णपणे बंद ठेवत नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. विविध पक्षांचे पदाधिकारी व स्थानिक नेत्यांनी आपल्या भाषणातून या प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवला.
यावेळी नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आघाव, उपनगराध्यक्षा सौ.शालिनीताई संजय सुखधान, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे, भाजपचे नगरसेवक निरंजन डहाळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आण्णासाहेब पटारे, व्यापारी संघटनेचे कुणाल मांडण, युवा नेते गणेश चौगुले, सामाजिक कार्यकर्ते शांताराम गायके, आरपीआयचे संजय बनसोडे, नगरसेवक स्वप्नील मापारी, संतोष राजगिरे, येडुभाऊ सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी झालेल्या निषेध मोर्चात नेवासा नगरपंचायत नगरसेवक, विविध पक्षाचे पदाधिकारी, महिला तरुण भर उन्हात मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपनगराध्यक्षा सौ. शालिनीताई संजय सुखधान या महिलांसह या आंदोलनात राष्ट्रध्वज तिरंगा घेऊन मोर्चात सहभागी झाल्या होत्या. मोर्चानंतर तहसीलदार संजय बिरादार व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर काढण्याचे आश्वासन दिले तसेच आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. दरम्यान लवकरात लवकर संबंधित गुन्हा मागे घेऊन दोषींवर कारवाई न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे.
१३ एप्रिल रोजी सायंकाळी नेवासा पोलीस स्टेशनपासून जवळच गोळीबार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. नेवासा पोलिसांना त्याची माहिती का मिळाली नाही? तसेच घटना नेवाशात घडल्याचे सांगितले असताना फिर्याद पाच दिवसांनी अहिल्यानगर येथे का दाखल करण्यात आली? या प्रश्नांमुळे प्रकरण अधिकच संशयास्पद ठरत आहे.



