
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : आगामी बकरी ईद, अहिल्याबाई होळकर जयंती आणि इतर सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नेवासा शहर व तालुक्यात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने नेवासा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार, गो-तस्करी करणारे आणि बेकायदेशीररित्या शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांना २३ मे ते ३१ मे या कालावधीसाठी नेवासा तालुका हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार आणि अप्पर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांच्या आदेशान्वये (BNSS १६३ प्रमाणे) ही धडक कारवाई करण्यात आली आहे.
तडीपारीच्या आदेशांची बजावणी
अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडून प्राप्त झालेल्या एकूण ३४ अंतिम आदेशांपैकी आतापर्यंत २९ गुन्हेगारांना तडीपारीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे एकूण ३४ पैकी २९ नोटिसांची बजावणी पूर्ण झाली असून, उर्वरित ०५ जणांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांचा कडक इशारा
सदर तडीपारीचे आदेश २३ मे ते ३१ मे या कालावधीसाठी लागू राहतील. या आदेशाची बजावणी झाल्यानंतर जर कोणताही तडीपार केलेला गुन्हेगार या कालावधीत नेवासा तालुक्याच्या हद्दीत मिळून आल्यास, त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ प्रमाणे तत्काळ व कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. आगामी काळात सर्व सण शांततेत साजरे व्हावेत यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी दिली.



