अहिल्यानगर : राज्य शासनाच्या वतीने अहिल्यानगर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींना रस्ते विकासासाठी रस्ते अनुदान योजनेतून सुमारे ५ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
राज्य शासनाने राज्यातील महानगरपालिका तसेच नगरपालिकांना द्यावयाच्या मोटार वाहन कराच्या अभिहस्तांकित रकमांतून रस्ता अनुदानापोटी १५७.६० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून यामध्ये जिल्ह्यातील चौदा नगरपालिका, नगरपंचायती व एका महापालिकेचा समावेश आहे.
या रस्ते विकास अनुदान योजनेतून अहिल्यानगर महापालिकेस ७५ लाख, श्रीरामपूर, संगमनेर व कोपरगाव नगरपरिषदांना प्रत्येकी ५० लाख रुपये उपलब्ध होणार आहेत.
राहाता, शिर्डी, पाथर्डी, देवळाली प्रवरा, शेवगाव, जामखेड व श्रीगोंदा या ‘क’ वर्ग नगरपालिकांसाठी प्रत्येकी ३५ लाख, तसेच अकोले, कर्जत, पारनेर व नेवासा या नगरपंचायतींसाठी प्रत्येकी २० लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. शासन निर्णयानुसार वितरित करण्यात येणाऱ्या या सर्व निधीचे नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केले जाणार आहे.
सर्व रस्त्यांची कामे सार्वजनिक ठिकाणीच करण्यात येणार असल्याने नागरिकांच्या प्राथमिक सुविधांची कामे मार्गी लागणार आहेत. राज्य शासन शहरांच्या विकासाला पाठबळ देण्यासाठी विविध योजनांतून निधी उपलब्ध करून देत असून यामुळे नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता निश्चित होईल, असा विश्वास डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केला.