राज्यात 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी
साजरा होणार राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा; भाविकांत आनंदाचे वातावरण

स्वराज न्यूज नेटवर्क
मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरदार सुरू आहे. 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी महाराष्ट्रात सुट्टी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली होती.
आता याबाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 22 जानेवारी रोजी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टीची घोषणा करण्यात आली.
राज्य सरकारने एक पत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे. त्यामुळे रामभक्तांना आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कारण रामभक्तांसाठी 22 जानेवारी हा दिवस खूप खास दिवस असणार आहे. दुपारी 12.20 वाजता प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी जगभरातील रामभक्त आतुर झाले आहेत. या दिवसासाठी देशभरातील मंदिरांमध्ये सुद्धा विशेष तयारी करण्यात येत आहे.
याआधी केंद्र सरकारनेही 22 जानेवारी रोजी केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांना अर्ध्या दिवसाची सुट्टी देण्याची घोषणा केली आहे.
श्रीरामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टने 22 जानेवारी रोजी मोजक्याच पाहुण्यांना सोहळ्याचे आमंत्रण दिले आहे. मात्र, असे असले तरी देशभरातील विविध राज्य सराकर आणि रामभक्तांनी ठिकठिकाणी वेगवेगळी तयारी केली आहे. अनेक ठिकाणी राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळा लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. तर कुठे राम मंदिरात भव्य सोहळ्यांचे आयोजन कऱण्यात आले आहे.