
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : तालुक्यातील मुरमे येथे रविवार (दि 21) जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता शब्दगंध साहित्यिक परिषद अंतर्गत नेवासा शाखेच्या वतीने फिरते मोफत वाचनालय आपल्या दारी हा उपक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अजय साबळे होते.
याप्रसंगी बोलताना प्रा. डॉ. अशोकराव ढगे यांनी वाचनाचे महत्त्व विशद केले. नेवासा शाखेचे शब्दगंधचे अध्यक्ष प्राचार्य डॉ किशोर धनवटे म्हणाले की आपली संस्कृती जगात श्रेष्ठ आहे याची कारण आपल्याकडे निर्माण झालेले ग्रंथ व त्या ग्रंथाद्वारे संस्कारित झालेला शुद्ध आचार, शुद्ध विचार समाजाला एकत्रित बांधून ठेवतो. कुटुंब व्यवस्था आदर्श आहे. समाज व्यवस्थेची अधोगती टाळण्यासाठी वाचन संस्कृती जोपासली पाहिजे. त्यासाठी आम्ही गावोगाव जाऊन मौलिक विचार मांडतो व त्यातून नवीन पिढीला सांभाळण्यासाठी वाचन संस्कृती आवश्यक असल्याचे प्रतिपादित करतो.
या उपक्रमप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना सरपंच अजय साबळे म्हणाले की मुरमे गाव श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा यांच्या तपश्चर्येने पतित पावन झालेली भूमी आहे. गुरुवर्य मठाधिपती भास्करगिरी महाराज व गुरुवर्य हभप प्रकाशानंदगिरी महाराज यांच्यामुळे समाजात सुसंस्कृतपणा जोपासला जात आहे. श्रीक्षेत्र देवगड मुरमे येथे डॉक्टर ढगे व प्राचार्य डॉक्टर धनवटे यांनी आमच्यासाठी हा उपक्रम राबवला त्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यास शब्द अपुरे आहेत. प्रास्ताविक करताना शब्दगंधाचे उपाध्यक्ष दिगंबर गोंधळी यांनी सर्व ग्रामस्थांचे स्वागत केले व संबळ वाजून पहाडी आवाजात शिक्षणाचे महत्व गीताद्वारे सादर करून सर्वांचे लक्ष वेधले.
या कार्यक्रमाला सौ. बोठे, ज्येष्ठ नागरिक मोहन वरखडे मा. सरपंच मारुतराव वरखडे, रामदास मोरे व ग्रामस्थ उपस्थित होते.