google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नेवासा येथे लाखो भाविकांची मांदियाळी

कामिका एकादशी निमित्ताने घेतले 'पैस' खांबाचे दर्शन

                                      स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरी व अमृतानुभव या ग्रंथाचे रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथे कामिका वद्य एकादशीच्या यात्रेनिमित्त माऊलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या ‘पैस’ खांबाचे दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी “पुंडलीक वरदे…हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम” च्या जयघोषाने नेवासे नगरी दुमदुमली होती.
     
           एकादशीच्या निमित्ताने सोमवार दि.२१ जुलै रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास वेदमंत्राच्या जयघोष करत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख वेदांताचार्य हभप गुरुवर्य श्री देविदासजी महाराज म्हस्के रामायणाचार्य हभप नंदकिशोर महाराज खरात, ज्ञानेश्वर माऊली शिंदे, कृष्णाभाऊ पिसोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत  पैठण येथील संत एकनाथ महाराज यांचे वंशज डॉ. मेघशाम महाराज गोसावी, ज्ञानराज महाराज गोसावी, राजवर्धन महाराज, देवस्थान विश्वस्त कैलास जाधव, प्रतिभा जाधव यांच्या हस्ते माऊलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या ‘पैस’ खांबास सपत्नीक अभिषेक घालण्यात आला.

             आषाढी शुद्ध नंतर येणारी आषाढी वद्य  कामिका एकादशी ही माऊलींची एकादशी संबोधली जाते. पंढरपूरच्या वारीची पूर्णता ही माऊलींच्या या एकादशीला होते म्हणून माऊलींच्या या एकादशीला फार महत्व असते. यात्रेच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणाच्या बाहेर दर्शनबारी रांगेसह मुख दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. एक किलोमीटर अंतरावर दर्शन बारीसाठी रांगा लागल्या होत्या. मंदिर प्रांगणात माजी आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळासह पंचगंगा उद्योग समूहाच्या वतीने प्रमुख उद्योजक प्रभाकरराव शिंदे, संचालक बाळासाहेब शिंदे, काकासाहेब शिंदे यांच्या वतीने आलेल्या भाविकांसाठी ७५ क्विंटल मोफत शाबुदाना खिचडी प्रसादाचे वाटप  करण्यात आले.
                          संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे जाणाऱ्या वाटेवर हॉटेल व्यावसायिक रविराज तलवार, नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील यांच्या लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्था तसेच सुवर्णकार समाज बांधवांच्या वतीने संत नरहरी महाराज मंदिरात भाविकांना शाबुदाणा खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. तर स्वप्नील मगर व परिवाराच्या वतीने थंडगार पाण्याचे वाटप करण्यात आले. नेवासाफाटा रस्त्यावर नागेबाबा पतसंस्थेच्या वतीने भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले. नेवासा शहरात श्री मोहिनीराज मंदिराच्या समोर श्री मोहिनीराज भक्त मंडळाच्या वतीने उकडलेले शेंगदाण्याचे व चहाचे वाटप करण्यात आले.
          एकादशीच्या निमित्ताने देवगड दत्त मंदिर संस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज, जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नेवासा तालुक्याचे आ. विठ्ठलराव लंघे पाटील, मा. आ. बाळासाहेब मुरकुटे, विश्वासराव गडाख यांनी मंदिरास भेट देऊन माऊलींच्या पैस खांबाचे दर्शन घेतले.
   
         नेवासा शहरात येणाऱ्या माऊली भक्तांच्या सेवेसाठी प्रशासनाच्या वतीने तहसीलदार डॉ. संजय बिरादार तर पोलीस दलाच्या वतीने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चौकाचौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
         
           नेवासा शहरातील जिल्हा परिषद शाळा प्रांगण, ज्ञानोदय हायस्कूल प्रांगण, नेवासा बुद्रुक येथील नाथबाबा विद्यालय, नेवासा मार्केट कमिटी प्रांगण या मुख्य ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. कामिका वद्य एकादशीच्या निमित्ताने पहाटे पासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. संत ज्ञानेश्वर महाराज ‘पैस’ खांब मंदिराचे जीर्णोद्धारक  वैकुंठवाशी हभप बन्सी महाराज तांबे यांच्या समाधी मंदिरावर केलेली विद्युत रोषणाई भाविकांचे आकर्षण ठरली होती. तर आषाढी वद्य एकादशी ही माऊलींची एकादशी असल्याने नेवासा शहरासह संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे जाणारे रस्ते गर्दीने फुलून गेले होते.
   
          आषाढी वद्य कामिका एकादशीच्या निमित्ताने नेवासा तालुक्यासह राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव या भागातून आलेल्या शेकडो दिंड्यांनी येथे “ज्ञानोबा माऊली तुकाराम” चा गजर करत हजेरी लावली. यावेळी आलेल्या सर्व दिंडयांतील वारकऱ्यांचे मंदिर देवस्थानचे प्रमुख विश्वस्त हभप देविदासजी महाराज म्हस्के, देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मा. आमदार पांडुरंगजी अभंग यांच्यासह विश्वस्त मंडळाने स्वागत केले व श्रीफळ प्रसाद देऊन सन्मान केला. यात्रेनिमित्त नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!