अखेर दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली
दहावीचा निकाल आठ मे रोजी; दुपारी 1 वाजता होणार ऑनलाईन जाहीर स्पष्ट होणार लाखो विद्यार्थ्यांचा पुढील शैक्षणिक मार्ग

यंदा देखील राज्यभरातील विविध विभागीय मंडळांमधून लाखो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, लातूर आणि कोकण या विभागीय मंडळांतर्गत परीक्षा पार पडल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी दहावीचा निकाल अत्यांत महत्वाचा मानला जातो. विज्ञान, वाणिज्य, कला, तांत्रिक शिक्षण, आयटीआय, डिप्लोमा किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांची दिशा ठरवण्यात या निकालाची महत्वाची भूमिका असते.
विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार असून, त्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर जाऊन लॉगिन करावं लागणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला रोल नंबर किंवा सीट नंबर आणि आईचे नाव नमूद करावे लागणार आहे. काही वेळा विद्यार्थ्यांकडून आईचं नाव भरताना स्पेलिंगची चूक होते, त्यामुळे माहिती काळजीपूर्वक भरावी, असं आवाहनही करण्यात आलं आहे.
निकाल पाहण्यासाठी उपलब्ध असलेल्या अधिकृत वेबसाईट्स
results.digilocker.gov.in
mahahsscboard.in
sscresult.mkcl.org
results.targetpublications.org
results.navneet.com
निकाल पाहताना वेबसाईट स्लो होण्याची शक्यता लक्षात घेता विद्यार्थ्यांनी संयम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निकाल जाहीर होताच लाखो विद्यार्थी एकाच वेळी वेबसाईटवर लॉगिन करतात, त्यामुळे काही वेळ सर्व्हर डाऊन किंवा संकेतस्थळ मंद गतीने सुरू राहू शकते. अशा परिस्थितीत वारंवार रिफ्रेश करण्याऐवजी काही मिनिटांनी पुन्हा प्रयत्न करावा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
यंदा डिजीलॉकरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डिजिटल मार्कशीटही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिकृत कागदपत्रांची डिजिटल प्रत सहज डाउनलोड करता येणार आहे. पुढील प्रवेश प्रक्रियेदरम्यान ही डिजिटल मार्कशीट तात्पुरत्या स्वरूपात ग्राह्य धरली जाऊ शकते. निकालानंतर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांबाबत शंका वाटत असेल किंवा अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याचे वाटत असेल, त्यांच्यासाठी गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेची प्रत मिळवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार असून, निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज करताना निर्धारित शुल्क आणि वेळापत्रकाची माहिती अधिकृत वेबसाईटवरून तपासून घ्यावी. दरम्यान, शिक्षणतज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना निकाल काहीही लागला तरी खचून न जाण्याचं आवाहन करण्यात येत आहे. दहावीचा निकाल हा आयुष्याचा शेवट नसून पुढील वाटचालीचा एक टप्पा आहे. अनेक विद्यार्थी अपेक्षेपेक्षा चांगले गुण मिळवतात, तर काहींना निराशाही पदरी पडते. मात्र, अपयश आलं तरी त्यातून शिकून पुढे जाणं महत्त्वाचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
जे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी राज्य मंडळाकडून जुलै-ऑगस्ट महिन्यात पुनर्परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं एक संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. पुनर्परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया, वेळापत्रक आणि इतर माहिती मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांनी निकाल पाहिल्यानंतर त्याची प्रिंटआऊट काढून ठेवावी किंवा पीडीएफ स्वरूपात सेव्ह करून ठेवावी. कारण महाविद्यालयीन प्रवेश, शिष्यवृत्ती अर्ज किंवा इतर शैक्षणिक प्रक्रियेदरम्यान ही तात्पुरती मार्कशीट उपयोगी पडू शकते. आता राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या नजरा उद्याच्या निकालाकडे लागल्या असून, निकालानंतर विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासाला नवी दिशा मिळणार आहे.


