ब्रेकिंग
‘त्रिमूर्ती’ संस्थेच्या सत्तासंघर्षाचा बळी?
सचिवाची आत्महत्या, अध्यक्षासह सहा जणांवर गुन्हा; नेवासा तालुक्यात खळबळ

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : तालुक्यातील मुकिंदपूर येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थेतील अंतर्गत वादातून सचिव असलेल्या मनीष अण्णासाहेब घाडगे (वय ४०) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी त्यांच्या पत्नी मनीषा घाडगे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह सहा जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, मनीष घाडगे हे गेल्या १५ ते २० वर्षांपासून संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत होते. संस्थापक साहेबराव घाडगे यांच्या निधनानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. अध्यक्ष सुमती घाडगे, श्रुती घाडगे, स्नेहल घाडगे तसेच त्यांच्या पतींसह काही जणांनी संस्थेचा ताबा घेण्यासाठी मनीष घाडगे यांचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला होता. सचिवपदाचा राजीनामा देण्यासाठी तसेच वैयक्तिक मालमत्ता त्यांच्या नावावर करून देण्यासाठी वारंवार दबाव टाकला जात असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दि. २६ एप्रिल रोजी संबंधितांनी मनीष घाडगे यांना कार्यालयात बोलावून सचिवपदाचे अधिकार काढून घेतल्याचे सांगितले. तसेच खोटे आरोप व बदनामीची धमकी देत राजीनामा देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे ते तीव्र मानसिक तणावाखाली होते. पुढील दोन दिवसांत त्यांच्यावर पुन्हा दबाव आणण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
दि. २८ एप्रिल रोजी दुपारी त्यांनी स्वतःवर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गंभीर भाजलेल्या अवस्थेत त्यांना प्रथम नेवासा फाटा येथील रुग्णालयात, त्यानंतर अहिल्यानगर येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान दि. १ मे रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्यांनी मोबाईलमध्ये चिठ्ठी लिहून काही व्यक्तींमुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३३९/२०२६ नोंदविण्यात आला असून, सोपान बाजीराव काळे, अनुराधा उत्तम गोरे, सुमती साहेबराव घाडगे, स्नेहल साहेबराव घाडगे, श्रुती साहेबराव घाडगे व चेतन चव्हाण यांच्याविरोधात बीएनएस कलम १०८, ११५(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नेवासा पोलीस करत आहेत.
माझ्या पतीला पदाचा राजीनामा देण्यासाठी आणि त्यांची मालमत्ता बळकावण्यासाठी आरोपींनी खोट्या गुन्ह्यांच्या धमक्या दिल्या. सततच्या मानसिक छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आहे.” – मनीषा मनीष घाडगे (फिर्यादी)



