ब्रेकिंग
संतोष खाडेंच्या विशेष पथकाची धडक मोहीम
चार लाखांचा मुद्देमाल जप्त; पाथर्डीत अवैध मावा कारखान्यांवर छापा

स्वराज न्यूज नेटवर्क
पाथर्डी : नगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरात सुगंधी तंबाखू आणि मावा तयार करणाऱ्या तीन बेकायदेशीर कारखान्यांवर पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार विशेष पोलिस पथकाने कारवाई करून एकूण ३,९४,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई दिनांक २१ जून रोजी करण्यात आली.
पहिली कारवाई चिंचपूर रोडवरील गणेश अशोक हारदे (वय ३०) याच्या घरात करण्यात आली. या ठिकाणी मिक्सर मशिनच्या सहाय्याने सुगंधी तंबाखू व सुपारी मिसळून मावा तयार केला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून दोन मशिन्ससह १,२८,५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुसऱ्या कारवाईत खंडोबा माळ येथील रविंद्र पांडुरंग लगड (वय ३९) याच्या घरात चार मशिन्स, सुगंधी तंबाखू व तयार मावा असा एकूण १,७२,१०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने तो ताब्यात घेण्यात आला. तिसऱ्या कारवाईत कसबापेठ येथील सुनिल नाथा शिंदे (फरार) याच्या घरी छापा टाकण्यात आला. पोलिस पथकाची चाहूल लागताच तो पळून गेला. मात्र त्याच्या घरातून दोन मशिन्ससह ९४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या तीन कारवायांमध्ये एकूण आठ मावा तयार करण्याच्या मशिन्स (किंमत ₹३,३५,०००) आणि सुगंधी तंबाखू व तयार मावा (७३.५ किलो, किंमत ₹५९,६५०) असा एकूण ₹३,९४,६५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ६८८/२०२५ अन्वये भादंवि कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत कलम २७(३)(ड), २७(३)(इ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांचे मार्गदर्शन आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या देखरेखीखाली पार पडली. विशेष पथकाचे प्रभारी संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पोसई राजेंद्र वाघ, शकील शेख, शंकर चौधरी, जालिंदर दहिफळे,अजय साठे, दिगंबर कारखिले, मल्लिकार्जून बनकर, दिनेश मोरे, उमेश खेडकर, सुनिल पवार आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय भूमिका बजावली. पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.



