स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा नगरपंचायत हद्दीत ‘शासन आपल्या दारी’ या राज्य सरकारच्या कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय अधिकारी त्याचबरोबर विविध संस्थांचे पदाधिकारी एकत्रित घेऊन जनतेच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने हा विशेष कार्यक्रम शासकीय पातळीवर सरकारतर्फे राबविण्यात येत आहे. नेवासा नगरपंचायतचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा नगरपंचायतमध्ये आज शुक्रवार (दि.26) रोजी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमास शहरातील नागरिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नेवासा नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी रामदास म्हस्के यांनी आपल्या प्रास्ताविकात सरकारी काम आणि सहा महिने थांब हे चित्र आता बदलणार असल्याचे सांगून नागरिकांना सरकारी योजना आणि कागदपत्रे एकाच ठिकाणी सहज उपलब्ध करून देणे हा ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश असल्याचे सांगितले.

यावेळी शिबिरामध्ये पशु वैद्यकीय विभाग, नेवासा महसूल विभाग, शिक्षण विभाग, ग्रामीण आरोग्य केंद्र, आशा कर्मचारी, नेवासा हद्दीतील स्वस्त धान्य दुकानदार, कृषी विभाग, तहसील पुरवठा विभाग, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, कामगार तलाठी असे विविध विभागाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रधानमंत्री आवास योजना, दिव्यांग योजना, जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, बांधकाम कामगार प्रमाणपत्र, फेरीवाले धोरण व सर्वेक्षण कार्यक्रम, प्रधानमंत्री स्वनिधी योजना आदींचे विविध विभाग लावण्यात आले होते. शिबिरामध्ये दिव्यांग योजनेअंतर्गत एकूण 75 अर्ज दाखल करण्यात आले.जन्म मृत्यू दाखल्याचे चार अर्ज तर बांधकाम कामगार प्रमाणपत्रासाठी 12 अर्ज सादर करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी रामदास म्हस्के, योगेश गवळी, अरुण चव्हाण, राजेश्वर सोनवणे, प्रताप कडपे, सुधीर चित्ते, ताराचंद चव्हाण, सुधाकर चांदणे, अरुण चित्ते आदी कर्मचारी सहभागी झाले होते.