राज्यात दर दोन वर्षांनी विश्व मराठी संमेलन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन; ‘विश्व मराठी संमेलन 2023’ चे थाटात उद्घाटन
मुंबई : विश्व मराठी संमेलनास राज्य शासन पूर्ण पाठबळ देईल आणि दर दोन वर्षांनी राज्यातील निरनिराळ्या शहरांमध्ये हे संमेलन भरविण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ‘मराठी तितुका मेळवावा’ या पहिल्या विश्व मराठी संमेलनाचे आज मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया, वरळी येथे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.
मराठी ज्ञानभाषा व्हावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेचे शिक्षण हे आपल्या मातृभाषेमध्ये होत नाही, तोपर्यंत आमच्या भाषा या वैश्विकभाषा होऊ शकणार नाही, मराठी ही ज्ञानभाषा होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी, नवीन शैक्षणिक धोरणात उच्च शिक्षण राज्याच्या भाषेत तयार करण्याचे सर्व राज्यांना आवाहन केले. महाराष्ट्राने त्यानुसार काम सुरू केले असून त्यात आघाडी घेतली आहे. मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचे काम राज्य शासन करीत आहे.
मुंबईतून मराठी हद्दपार होणार नाही – मंत्री दीपक केसरकर
यावेळी बोलतांना मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले, मुंबई म्हणजे मराठीची राजधानी आहे. येथे मराठी भाषा टिकली पाहिजे. मुंबईतून मराठी हद्दपार होणार नाही, हा शासनाचा निर्धार आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार वैश्विक स्तरावर होण्यासाठी ‘मराठी तितुका मेळवावा’ या उदात्त हेतूने मराठी भाषा विभागामार्फत मुंबईत विश्व संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
प्रास्ताविक मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर यांनी केले तर राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांनी आभार मानले.
क्षणचित्रे
↔परदेशातील 498 मराठी मंडळांतील प्रतिनिधी, 62 परदेशस्थ उद्योजक, परराज्यातील 470 बृहन्महाराष्ट्र मंडळाचे प्रतिनिधी, 164 राज्यातील नामवंत साहित्यिक संमेलनासाठी उपस्थित लेझिम पथकांकडून उपस्थित मान्यवरांचे वाजत गाजत स्वागत.
↔संपूर्ण परिसरात मराठी पेहराव केलेल्या देश विदेशातून आलेल्या मराठी प्रेमींची गर्दी
↔मराठी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या जात्यावरच्या ओव्या, रांगोळीने सजवलेले तुळशी वृंदावन, खलबत्ता वापरत असणाऱ्या मराठी गृहीणींचे देखावे.
↔पुस्तक विक्रीसाठी वेगवेगळी दालने
↔खानदेशी, वऱ्हाडी, मराठवाडा, कोकणी अशा विविध भागातील खाद्यपदार्थांचा जेवणात समावेश.