ब्रेकिंग
नेवासा तालुक्यात वाळू तस्करांवर कारवाई
75.80 लाखांचा मुद्देमाल जप्त; 9 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल; संतोष खाडेंच्या पथकाची कारवाई

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथील गोदावरी नदी पात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या टोळीवर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई केली. ७५,८०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत ९ आरोपींविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पोलीस पथक तयार करण्यात आले असून, या पथकाने दि. २५ जून रोजी ही कारवाई केली. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गोधेगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रामध्ये काही व्यक्ती जेसीबीच्या सहाय्याने विनापरवाना वाळू उपसा करून ती ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरून वाहतूक करत आहेत. मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे त्यांनी नेवासा पोलीस स्टेशनच्या स्टाफसह आणि पंचांसह घटनास्थळी छापा टाकला.
कारवाईदरम्यान काही आरोपी वाहनासह पळून गेले, परंतु पोलिसांनी पाठलाग करून ३ आरोपींना पकडले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रविण नामदेव म्हस्के (रा. नेवासा खुर्द), विशाल दत्तात्रय ठोंबरे (जेसीबी चालक, रा. गोधेगाव), व अभिषेक भिमराज जाधव (वाळू भरणारा, रा. गोधेगाव) यांचा समावेश आहे. घटनास्थळी १ जेसीबी, ५ वाळूने भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली, आणि १ वाळू भरण्यासाठी आलेला ट्रॅक्टर असा एकूण ७५.८० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. पळून गेलेल्या वाहनचालकांची नावे राजेंद्र गोलांडे (रा. गोधेगाव), दिलीप शेलार (रा. गोधेगाव), कृष्णा पुनमसिंग परदेशी (रा. नेवासा खुर्द), कल्याण उन्हाळे (रा. प्रवरासंगम), काका पठारे (रा. धामोरी), व एक अज्ञात कुबोटा ट्रॅक्टर मालक अशी सांगितली गेली.
या प्रकरणात जप्त केलेल्या वाहनांमध्ये विशाल ठोंबरे याचा ३० लाखांचा जेसीबी, काका पठारे याचा ७ लाखांचा न्यू हॉलंड ट्रॅक्टर, कुबोटा ट्रॅक्टर व ट्रॉली ९ लाखांचे, कल्याण उन्हाळे याचा जॉन डिअर ट्रॅक्टर ८ लाखांचा, दिलीप शेलार याचा महिंद्रा ट्रॅक्टर ७ लाखांचा, कृष्णा परदेशी याचा न्यू हॉलंड ट्रॅक्टर ७.५ लाखांचा आणि राजेंद्र गोलांडे याचा महिंद्रा ट्रॅक्टर ७ लाखांचा आहे. याशिवाय अंदाजे ३०,०००/- रुपये किमतीची ५ ब्रॉस वाळू ट्रॉलीमध्ये भरलेली आढळून आली.
या गुन्ह्याची नोंद नेवासा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६२३/२०२५, भा.दं.वि. कलम ३०५(ई), ३(५) सह पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ३/१५ अंतर्गत करण्यात आली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे (श्रीरामपूर विभाग), व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुनील पाटील (श्रीरामपूर उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
ही कारवाई परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकातील पोलीस निरीक्षक राजेंद्र वाघ, सहाय्यक फौजदार शकील शेख, पोहेकॉ. शंकर चौधरी, अजय साठे, दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, उमेश खेडकर, अरविंद भिंगारदिवे, दिनेश मोरे, पो.कॉ. सुनिल दिघे, अमोल कांबळे, विजय ढाकणे, दीपक जाधव, व जालिंदर दहिफळे यांनी केली. पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.
https://youtu.be/ujbpaSfa5Ds?si=n6bpLHOy_9nG1tmK



