स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा – नेवासा फाटा रस्त्यावरील मध्यमेश्वरनगर समोरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर भरधाव वेगात येणाऱ्या माल ट्रकने दुचाकीस्वारास जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवार (दि.23) रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, अब्बास अब्दुलहमीद शेख (वय 50 वर्षे) रा. आलमगीर ता. जि. अहमदनगर हे मोटारसायकल (एम. एच. 16 बी. डी. 1866) वरुन नेवाशाकडे येत असतांना समोरुन येणाऱ्या माल ट्रक (एम. एच. 17 बी. डी. 8700) भरधाव वेगात जोराची धडक दिल्याने मोटारसायकल स्वार डोक्याला व कानाला गंभीर मार लागून नाकातून रक्त येवून जखमी झालेला होता.
जखमीला रुग्णवाहिकेतून औषधोपचारासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचे उपचारापुर्वीच निधन झाल्याचे ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले.
याबाबत बरकत बरकतउल्ला शरीफ शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात माल ट्रक चालक सुधाकर वसंत चव्हाण (वय 35 वर्षे) रा. वार्ड नं. 7, सरस्वती कॉलनी, ता. श्रीरामपुर याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तुळशीराम गिते हे पुढील तपास करत आहेत.