गुन्हेगारी
नेवासा पोलिसांची अवैध धंद्यावर कारवाई
अवैध दारु विक्रेते, मटका, जुगार अड्ड्यावर छापेमारी साडे 56 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : परिवक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध दारु विक्री, मटका जुगार खेळविणारे तसेच गांजा पिणारे इसमांची खात्रीलायक माहिती मिळालेवरुन त्यांनी केलेल्या कारवाईत एकूण 18 गुन्हे दाखल करण्यात येऊन 56 हजार 470 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
परिवक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे एकुण ११ पथके तयार करुन त्यांना सदर ठिकाणी पंचासह जावुन छापा टाकुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन व सुचना देवून शिताफीने छापेमारी करुन गुन्हे दाखल करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार सदर पथकाने पोलीस स्टेशन नेवासा हद्दीमधील मिळालेल्या माहितीनुसार ठिकठिकाणी जावुन शिताफीने छापेमारी करुन मुंबई दारुबंदी कायद्याखाली एकुण १४, मुंबई जुगार कायद्याखाली एकुण ०३ व NDPS कायद्यांतर्गत ०१ असे एकुण १८ गुन्हे दाखल केलेले असुन सदर छापेमारी एकुण ५६४७०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
तरी यापुढे पोलीस स्टेशन नेवासा हद्दीमध्ये अशाच प्रकारे अवैध धंदे चालकांवर छापेमारी करुन कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असुन ज्या व्यक्तींवर सदर कायद्यांतर्गत एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल असतील त्यांच्याविरुध्द जास्तीत जास्त रक्कमेचा बॉन्ड घेवुन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे तसेच यापुढेही सदर इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करुनही फरक न पडल्यास हद्दपार सारखी कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच यापुढेही अशा प्रकारे अवैध धंदे चालकांवर कारवाई चालु राहणार असल्याचे सांगितले.