गुन्हेगारी
नेवासा पोलीस ठाण्यात ‘पोलीस उपअधीक्षक राज’
पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांची नियुक्ती; पोलीस निरीक्षक धनंजय जाधव नियंत्रण कक्षात

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा पोलीस ठाण्यात पोलीस उपअधीक्षक (प्रशिक्षणार्थी) म्हणून संतोष खाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना पोलिस ठाणे प्रभारी अधिकारीपदाच्या कामकाजाची माहिती मिळावी यासाठी त्यांना नेवासे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तीन महिन्यांसाठी करण्यात आले आहे. खाडे यांनी आपला पदभार मंगळवार ( दि. 25 ) रोजी स्वीकारला.
दरम्यान, नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना नियंत्रण कक्ष, अहिल्यानगर येथे नवीन आदेश प्राप्त झाला आहे. त्यांच्या बदलीमुळे स्थानिक पोलीस व्यवस्थापनात काही बदल होण्याची शक्यता आहे.
परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते अत्यंत सामान्य अशा ऊस तोडणी कामगार दांपत्याचे चिरंजीव आहेत. नाशिक येथील प्रशिक्षणानंतर त्यांनी अहिल्यानगर येथे आपल्या कारकीर्द सुरुवात केली व त्यांना प्रथमच नेवासा तालुक्यात पोलीस स्टेशनच्या रूपाने पहिलेच पोलीस स्टेशन प्रशिक्षणार्थी म्हणून मिळाले आहे.
तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी ठसा उमटवणारे कार्य करण्यासाठी नेवासा परिसरातील गुन्हेगारी नियंत्रण आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी सर्व बेकायदेशीर व्यवसाय विरुद्ध कठोर पाऊल उचलणार असल्याचे स्पष्ट केले. पोलिस ठाणे हद्दीतील सर्व अवैध धंदे बंद करून कोठे आढळल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याबाबत सूचना पोलीस अंमलदारांना दिल्या आहेत.