
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा खुर्द येथे एका घराच्या कंपाउंडमधून मोटारसायकल चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच याच ठिकाणी जवळील एका दुकानातही चोरी झाल्याचे उघड झाले आहे.
नेवासा-नेवासा फाटा रस्त्यावरील येथील पावन गणपती मंदिरासमोर राहणारे सुरज राज पटारे (वय 28) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी 3 मे 2019 रोजी बजाज पल्सर 220 (गाडी क्रमांक MH 17 CG 3026) विकत घेतली होती, जी ते दररोज वापरत होते. 28 मार्च रोजी रात्री 11 वाजता त्यांनी ही मोटारसायकल त्यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये लावली आणि झोपी गेले. मात्र, 29 मार्च रोजी सकाळी 6 वाजता त्यांच्या आजी आशाबाईंना गाडी दिसली नाही. त्यांनी घरातील सदस्यांना उठवून सांगितले, तेव्हा सर्वांनी बाहेर येऊन पाहिले असता मोटारसायकल गायब असल्याचे आढळले. शिवाय, कंपाउंडच्या स्लायडिंग गेटच्या छोट्या दरवाजाचे कुलूप तुटलेले होते.
दुकानातही चोरीचा प्रकार
याच परिसरातील विजय मच्छींद्र लोखंडे यांच्या ‘श्री पार्वती ऑईल अँड प्रोडक्ट’ या दुकानातही चोरी झाल्याचे निदर्शनास आले. दुकानाच्या मागील दरवाजाचा कोंडा वाकवून चोरट्यांनी प्रवेश केला आणि तेलाच्या बाटल्या, तुपाचे डबे, गूळ तसेच रोख रक्कम 3,000 रुपये चोरून नेले.
सीसीटीव्हीमध्ये चोरीचे दृश्य कैद
या घटनेबाबत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, तीन चोरटे चोरी करताना दिसले. त्यातील एकजण मोटारसायकलवर बसलेला होता, दुसरा चोर ती ढकलत नेत होता, तर तिसऱ्याच्या हातात तलवार होती. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासन नी तात्काळ गाडीचा शोध लागावे आणि गुन्हेगारांना अटक करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे