क्रिडा व मनोरंजन
आषाढी एकादशीला कुर्बानी नाही!
नेवाशात मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय; शांतता कमिटीच्या बैठकीत एकमुखी निर्णय
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : आषाढी एकादशी तसेच मुस्लीम बांधवाचा सण बकरी ईद 29 जून रोजी आहे. बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव बकरीची कुर्बानी देतात, तर आषाढी एकादशीला वारकऱ्यांचा उपवास असतो. त्यामुळे हिंदू बांधवांच्या भावनांचा आदर करत नेवासा शहरातील मुस्लीम बांधवांनी यंदा बकरी ईदला दिली जाणारी कुर्बानी त्या दिवशी न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे नेवासा शहरातून व वारकरी संप्रदायातून स्वागत होत आहे.
नेवासा पोलीस ठाण्यात शनिवार (दि. 24) रोजी सायंकाळी आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीत मुस्लिम समाजाचे शहरातील नेत्यांनी घोषणा केली
यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे म्हणाले की नेवासा शहरात मागील काळात काही चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत. अशा प्रकारामागे विविध समाजातील फक्त दोन टक्के लोक असतात. जे कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करतात. या लोकांना आपणच जागेवर आणू शकतो. आषाढी एकादशी व पवित्र बकरी ईद एकाच दिवशी आहे. सण, उत्सव एकमेकांच्या हातात हात घालून येतात मग आपण देखील अशाच प्रकारे हातात हात घालून एकत्रितपणे सर्व सण उत्सव साजरे करावे. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करा, चांगल्या कार्यात बाधा आणणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचा इशारा यावेळी दिला.
या प्रसंगी जातीय सलोखा समितीचे आसिफ पठाण, बहुजन चळवळीचे नेते संजय सुखदान, इम्रान दारुवाला, राजेंद्र मापारी, जेष्ठ नेते रहेमानभाई पिंजारी, अब्बास बागवान, साईनाथ लष्करे, अँड. जावेद ईनामदार, सुलेमान मणियार, मौलाना तन्वीर, प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड, रमेश शिंदे, पवन गरुड, कैलास लष्करे, यांच्यासह शांतता कमिटीचे सदस्य व शहरातील सर्व धर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईद आल्याने हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरी होणार आहेत. हिंदू समाजाच्या भावनांचा आदर करून नेवासा शहरात हिंदू-मुस्लिम एकता नांदावी आषाढी एकादशीच्या दिवशी मुस्लिम बांधवांच्या वतीने कुर्बानी न देण्याचा निर्णय आज सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे. ~आसिफ पठाण सदस्य, जातीय सलोखा समिती
आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईद साजरी न करता दुसऱ्या दिवशी बकरी ईद साजरी करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मुस्लिम समाजाने घेतलेला पुढाकार हा कौतुकास्पद आहे. ~ शिवाजीराव डोईफोडे पोलिस निरीक्षक, नेवासा.