नोकरी
होमगार्डचे विधानसभा निवडणूक बंदोबस्ताचे पैसे ‘पेंडिंग’
मानधनाचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने होमगार्ड हवालदिल; लोकसभा निवडणुकीचा 'बुथ भत्ता' ही रखडला

स्वराज न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर : राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या होमगार्ड दलातील जवानांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. मानधन वेळेवर मिळत नसल्याने त्यांना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत कर्तव्य बजावलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील होमगार्ड जवानांना अद्याप मानधन मिळालेले नाही.
राज्याच्या गृहविभागाने गृहरक्षकांना मानधन देण्यास विलंब झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. परंतु, हा आदेश केवळ कागदोपत्रीच मर्यादित राहिला आहे. गणेशोत्सव, नवरात्री, रमजान, मोहरम, शिवजयंती, शालेय-महाविद्यालयीन परीक्षा, मोर्चा-निदर्शने आणि विविध निवडणुकांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी होमगार्डचे जवान उपयुक्त ठरतात.

नेवासा होमगार्ड पथकात 143 होमगार्ड जवान कार्यरत आहेत. तर अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण 1900 च्या आसपास होमगार्ड जवान सेवा बजावत आहेत. तर राज्यात एकूण 49,188 होमगार्ड जवान कर्तव्य बजावत आहेत.
होमगार्डच्या जवानांना वर्षातून ५२ ते ६० दिवस ड्युटीवर बोलावले जाते. त्यांच्या मागण्यांकडे शासनाकडून लक्ष दिले जात नाही. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना मार्च 2019 मध्ये वर्षातील 180 दिवस होमगार्ड जवानांना ड्युटी देण्याचा शासन निर्णय जारी केला होता. त्यानंतर जुलै 2023 मध्येही मा. मंत्री महादेव जानकर यांनी होमगार्ड कल्याणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर प्रश्नोत्तराच्या तासात फडणवीस यांनी गृहरक्षक दलाच्या जवानांना 180 दिवसांचे काम देण्याचे आश्वासन सभागृहात दिले होते. मात्र शासन निर्णयाची अंमलबजावणी देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनुनही होत नाही. दुसरीकडे होमगार्डच्या जवानांना ३६५ दिवस काम द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र सरकार होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे.
कारवाईची तरतूद
होमगार्ड जवानांना केलेल्या कर्तव्याचे मानधन देण्यास पंधरा दिवसांपेक्षा जास्त विलंब झाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईची तरतूद आहे. गृह विभागाचे तसे परिपत्रक केवळ कागदावरच दिसत आहे. कदाचित त्यामुळेच गेल्या वर्षी मे महिन्यात लोकसभा निवडणुकीसाठी बंदोबस्त केलेल्या नगर जिल्ह्यातील होमगार्डला अद्याप बूथ भत्ता मिळालेला नाही. लोकसभा निवडणुक होऊन दहा महिने झाले तरी या बंदोबस्ताचे मानधन प्रलंबित आहे. सरकारच्या या उदासीन वृत्तीमुळे होमगार्ड्समध्ये असंतोष वाढत आहे.
कर्तव्यावर असताना सुविधांची वाणवा
होमगार्ड जवानांना ड्युटी व कर्तव्यावर असताना आपल्या घराच्या जवळचे ठिकाण मिळाले पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्या राहण्याची व्यवस्था तसेच आवश्यकतेनुसार त्यांच्या वाहनांमध्ये इंधन देण्याचा आदेश केला जातो परंतु कोणत्याही पोलीस स्टेशनकडून सदर आदेशावर अंमलबजावणी केली जात नाही. परिणामी त्यांना आपल्या घरापासून 30-35 किलोमीटर अंतरावर आपल्या खर्चाने प्रवास करावा लागतो.
होमगार्डमध्ये आहेत उच्चशिक्षित जवान
बेरोजगारीमुळे होमगार्ड संघटनेत अनेक उच्च शिक्षण घेतलेले होमगार्ड जवान आपली सेवा देत आहेत. त्यामध्ये बरेच जण पदव्युत्तर पदवी प्राप्त आहे. यात समाजसेवा, कायदा, कम्प्युटर या संदर्भातील पदव्युत्तर पदवी प्राप्त आहेत. पोलीस विभागात असलेल्या अनेक रिक्त पदांवर त्यांना नियुक्ती दिली जाऊ शकते.
पाच वर्षापासून नाही मिळाला कवायत भत्ता
होमगार्ड जवानांना सन 2020 पासून आजतागायत कोणत्याही प्रकारचा कवायत भत्ता दिला गेला नाही. होमगार्ड जवानांना महिन्याच्या प्रत्येक रविवारी अडीच तासाच्या कवायतीसाठी 90 रुपये देण्याची तरतूद होती. त्यामध्ये मागील वर्षी ऑक्टोबरपासून दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे. आता होमगार्डला प्रत्येक कवायतीचे 180 रुपये देण्याचे प्रयोजन आहे परंतु ते अद्यापही त्यांच्या पदरात पडलेले नाही.
होमगार्ड शिबिरांचे आयोजन नाही
प्रत्येक जिल्ह्यातील होमगार्ड जवानांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर एक दिवसाचे शिबिर आयोजन करण्याचे राज्य होमगार्ड कार्यालयाचे आदेश होते. त्यामध्ये तीन महिन्यातून एकदा असे शिबिर आयोजित केले जाऊन त्यामध्ये होमगार्डच्या समस्या, अडी अडचणी मांडल्या जात होत्या. परंतु गेल्या अनेक वर्षापासून अशा शिबिरांचे जिल्हास्तरावर आयोजन करण्यात न आल्यामुळे होमगार्डच्या समस्या ‘जैसे थे’ आहेत.
राज्य शासनाकडून होमगार्डचे प्रश्न सोडवण्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जाते. त्यांचे थकीत मानधन, बाहेरगावी बंदोबस्तकामी सोयी सुविधांचा अभाव व कायमस्वरूपी कर्तव्य देण्याचे प्रश्न प्रलंबित आहेत. परंतु बंदोबस्त केल्यानंतर त्यांच्या हक्काचे मानधन वेळेवर व नियमितपणे दिले जावे. – दत्तात्रय बनसोडे होमगार्ड जवान, नेवासा


