google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजन

सेंट मेरीज स्कूलमध्ये आनंद मेळावा संपन्न

गणित, विज्ञान आणि भाषा प्रदर्शनाचेही आयोजन; मेळाव्यात विद्यार्थ्यांनी दाखवले कौशल्य; पालक गेले भारावून

                                    स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : अहिल्यानगर येथील सेंट मेरीज स्कूलमध्ये गुरुवारी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय गणित, विज्ञान, क्रीडा, सामान्य ज्ञान, संगणक, इतिहास, भूगोल, चित्रकला, भाषा या विषयांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. ज्याचा विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी आनंद लुटला.
             कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. किशोर धनवटे व शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा नताशा विखोना उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी सामूहिक दीप प्रज्वलन करून आनंद मेळाव्यास सुरुवात केली. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, स्वागत नृत्य, शास्त्रीय नृत्य, फॅशन शोचे सादरीकरण केले. आनंद मेळाव्यात अहमदनगरचे प्रसिद्ध जादूगार धनंजय यांच्या जादूच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
                आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी चविष्ट खाद्यपदार्थ मोठ्या उत्साहात तयार केले. मुलांनी स्टॉलमध्ये वस्तू विकणे, विविध वस्तू बनवणे याचा आनंद लुटला. मुलांनी लावलेल्या स्टॉल्समध्ये प्रामुख्याने कच्ची दाबेली, सँडविच, पावभाजी, पाणीपुरी, मॅगी, छोले, भटुरे, वडा, साबुदाणा वडा, ओली भेळ, चहा, पुलाव यांची पंधराहून अधिक दुकाने लावली होती. काही मुलांनी बंदुकीच्या सहाय्याने फुगे फोडणे, हौजी, शूटिंगचे स्टॉलही लावले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेला आणि विद्यार्थ्यांवर चित्रित केलेला ‘ज्युरासिक पार्क’ हा लघुपटही मुलांना दाखवण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिवकालीन युद्ध शस्त्रांचे प्रात्यक्षिकही सादर केले. मुलांनी व्यावसायिक शिक्षण सकारात्मक पद्धतीने मांडले. मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकांनी मोठ्या संख्येने आनंद मेळावा पाहण्यास येऊन मुलांना प्रोत्साहन दिले.
           यावेळी प्रा. डॉ. किशोर धनवटे म्हणाले की, भूगोल हा असा विषय आहे जो आपल्या  सभोवताल पासून सुरू होऊन विश्वात संपतो. त्यांनी मुलांना स्टुडन्ट म्हणण्याऐवजी लर्नर म्हणवण्याचे आवाहन केले. दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा मनोदय करण्यास सांगितले. गटशिक्षणाधिकारी कराड आपल्या भाषणात म्हणाले की, शैक्षणिक प्रक्रिया केवळ वर्गापुरती मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच उद्देश असण्याचे स्पष्ट केले. त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करून उत्कृष्ट आणि उल्लेखनीय प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या.
          शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जोसी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शाळेत प्रथमच विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणाऱ्या सर्व विषयांसह विज्ञान व गणिताचे प्रदर्शन शाळेत तयार करण्यात आले आहे. प्रदर्शन आयोजित केल्याने विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळते. शाळेच्या चार भिंतीबाहेरचे हे उपक्रम प्रेरणादायी आहेत. विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान, क्रीडा, सामान्य ज्ञान, संगणक, इतिहास, भूगोल, चित्रकला आणि भाषा प्रदर्शनात विविध प्रकल्प तयार केले होते. हे प्रदर्शन सकाळी नऊ ते रात्री सात वाजेपर्यंत सुरू होते.
         आनंद मेळाव्याचा पालक, नागरिक व मुलांनी मनमुराद आनंद लुटला. स्वतःच्या दुकानाशिवाय इतर मुलांच्या दुकानातही मुले खरेदी करताना दिसत होती आणि पैशाचा हिशोब, वस्तू यांची काळजी घेत होती. यामध्ये शाळेतील शिक्षक संपूर्ण वेळ मुलांसह राहिले. कार्यक्रमात शाळेचे माजी विद्यार्थीही सहभागी झाले होते. 
             कार्यक्रमांच्या शेवटी लकी ड्रॉ स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय लोंढे, मुबिना शेख, संदीप सरोदे, स्वाती पाटील यांनी केले. सोनाली देवखिळे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या व्यवस्थापक सिस्टर मोली, सिस्टर लिसा, सिस्टर मुक्ता यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!